अहमदनगर महाविद्यालयातील पोलिस भरती केंद्र ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरेल - डॉ. आर. जे. बार्नबस



Ahmednagar College | नगर : दर्शक । 


   ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरती मार्गदर्शन केंद्र हे एक महत्त्वाचे व उपयुक्त पाऊल ठरणार असून, या केंद्राच्या माध्यमातून हजारो तरुण-तरुणींना पोलिस सेवेत सहभागी होण्याची दिशा मिळणार आहे, असे प्रतिपादन भा.पां. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. जे. बार्नबस यांनी केले.




     अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ’करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पोलिस भरती मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडले.








     या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर. जे. बार्नबस हे उपस्थित होते. त्यांनी केंद्राचे उद्घाटन करताना उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, ग्रामीण व शहरी भागातील तरुणांमध्ये पोलिस सेवेत जाण्याची जिद्द आहे. मात्र योग्य मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या मनातील इच्छा अपूर्ण राहते. हे केंद्र त्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे ठरेल. 





शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक तयारीसाठी येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ते पुढे म्हणाले, आज आपण ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत. हे उद्घाटन केवळ एका केंद्राचे नसून, एका नव्या युगाची सुरुवात आहे. 







माझी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की, आपण या केंद्राच्या कार्यक्षमतेत सातत्याने सहकार्य करावे. समाजातील प्रत्येक घटकातील तरुण या केंद्राच्या माध्यमातून पोलिस दलात भरती होऊन सामाजिक सुरक्षा व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुढे येतील, हीच आमची अपेक्षा आहे. यासोबतच डॉ. बार्नबस यांनी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे यांचे विशेष आभार मानले.





     या केंद्रामध्ये दैनंदिन शारीरिक प्रशिक्षण, लेखी परीक्षेसाठी अभ्यासवर्ग, मॉडेल टेस्ट्स, तसेच मानसिक तयारीसाठी व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. प्रशिक्षणार्थींना योग्य आहार, वैद्यकीय तपासणी व पोलिस भरती संदर्भातील सर्व तांत्रिक माहिती देखील दिली जाणार आहे.





     या कार्यक्रमास भा.पां. शिक्षण संस्थेचे सचिव विशाल बार्नबस, प्रमुख प्रशिक्षक आणि सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक राजू वैराळे (अ.नगर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी वैराळे यांचा सत्कार करण्यात आला.





     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. भागवत परकाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. तुषिता य्यर (समन्वयक उद्योजकता विकास) यांनी करून दिला. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सविओ वेगास (शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक) यांनी केले.





     या वेळी उपप्राचार्य प्रा. दिलीपकुमार भालसिंग, विनाअनुदान विभाग प्रमुख डॉ. सय्यद रज्जाक, उपप्राचार्य डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, रजिस्टर (प्रबंधक) श्रीमती कल्पलता भिंगारदिवे, डॉ. कमलाकर भट, ग्रंथपाल प्रशांत फुगणर, डॉ. अभिजित कुलकर्णी, प्रा. सुरेश घुले, डॉ. सचिन राळेगणकर आणि इतर प्राध्यापक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.