Bagul Pandagu Nagar | पद्मशाली समाजाचा बागेचा सण बागुलू पंडूगू शुक्रवार दि.11 जुलैला रोजी साजरा होणार
Bagul Pandagu Nagar | नगर : दर्शक ।
पद्मशाली समाजाचा बागेचा सण (बागुलू पंडुगू ) दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेनंतर येणार्या शुक्रवार दि. 11 जुलै 2025 रोजी साजरा होत आहे. पद्मशाली समाजामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून बागुलू पंडूगू हा सण म्हणजे बागेचा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो, अशी माहिती पंच कमेटी पद्मशाली ज्ञाती समाजाचे अध्यक्ष संजय वल्लाकट्टी यांनी दिली.
या दिवशी समाजातील प्रत्येक घरामध्ये गोड पुरी, मेथीची भाजी असे नैवेद्य पोषम्मा देवी व लक्ष्मीआई देवीला दाखवत व प्रत्येक जनसमुदायाकडून मिरवणूक काढून पोतराज यांना बरोबर घेऊन शितळादेवी मंदिर व बालिकाश्रम रोडवरील जाधव मळ्यातील लक्ष्मीदेवी मंदिरामध्ये जाऊन पूजाअर्चा करणे असे विधी होतात. या ठिकाणी मोठी जत्रा भरते.
हे सर्व करण्यामागचा हेतू असा आहे की, समाजातील लोक यादिवशी देवीला साकडे घालून निसर्गाचे रक्षण कर, तसेच पर्जन्यवृष्टी संतुलित होऊ दे व कुठेही दुष्काळ अगर अतिवृष्टीने नुकसान होऊ नये, अशी प्रार्थना केली जाते.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर शहरात बागुलू पंडुगू सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हे बहुतांश लोकांना माहित आहे. या सणासाठी बाहेरगावाहून खास नगर येथे पाहुणेमंडळी येऊन हा सण मोठ्या थाटात साजरा करतात.या सणाच्या दिवशी तोफखाना व बालिकाश्रम रोड या दोन्ही मंदिरात यात्रा भरणार असल्याचे दोन्ही मंदिराच्या पदाधिकार्यांनी जाहीर केले आहे.
या दिवशी शितळा देवी (पोशम्मा तल्ली ) आणि लक्ष्मीमाता (लचमम्मा तल्ली) यांची यथासांग पूजा अर्चना केली जाते तथा लक्ष्मी मातेची जत्रा असते. या सणाचे वैशिष्टे म्हणजे शितळादेवी (पोशम्मा) व लक्ष्मीआई (लचमम्मा) या देवींना नैवेद्य दाखवणे. हा नैवेद्य दाखवण्यामागे प्रमुख उद्देश असे आषाढ महिन्यात रोगराईचा वेगाने फैलाव होतो ही रोगराई थांबवून आम्हा सर्वांना चांगले आरोग्य प्रदान कर, अशा प्रकारचे साकडे देवीला घालण्याची पारंपारीक प्रथा आहे.
शितळादेवीच्या नावातच ’शित’ पणा आहे, त्यामुळे या देवीला थंड पदार्थाचे नैवेद्य अर्पित करतात. जसे दही, हळद टाकलेला भात, गोडपुरी, मेथीची भाजी, लिंबाची पाने, फुटाणे, नारळ, ओवा, आणि थंड पाणी इ. स्त्रिया आपल्या डोक्यावर थंड पाण्याचा कलश घेऊन वाजत गाजत मिरवणूक काढतात.
या कलशात लिंबाच्या पानाच्या डहाळ्या असतात. ही मिरवणूक गावाबाहेर असलेल्या पोचम्मा व लचमम्मा देवीच्या मंदिरापर्यंत जाते. या कलशाची स्थापना देव्हार्यामध्ये केली जाते, त्या नंतर नेवैद्य अर्पण केला जातो व सण साजरा केला जातो. समाज बांधवांना आणि सर्वांनाच बागुला पंडुगाच्या शुभेच्छा संजय वल्लाकट्टी यांनी दिल्या.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com