ए अँड ई रेजिमेंटमध्ये आयोजित वार्षिक एनसीसी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
NCC Nagar | नगर : दर्शक ।
"एनसीसी कॅडेटने स्वतःला सैनिक समजून प्रशिक्षण घेतल्यास सशस्त्र दलात यशस्वी करिअर घडवता येईल. आधुनिक युद्धकलेचा अभ्यास करून भारतीय लष्करात स्थान मिळवायचं असेल, तर प्रत्येक कॅडेटने आजपासूनच सैनिकाच्या भूमिकेतून विचार करायला हवा," असे प्रतिपादन १७ महाराष्ट्र बटालियन (एनसीसी) चे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रसाद मिजार यांनी केले.
नगर येथील ए अँड ई रेजिमेंटमध्ये आयोजित वार्षिक एनसीसी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या शिबिरात जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे ३५० कॅडेट्स सहभागी झाले असून, दहा दिवस चालणाऱ्या या निवासी शिबिरात त्यांना सैनिकी व व्यक्तिमत्त्व विकासाचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कर्नल मिजार पुढे म्हणाले, "एनसीसी ही केवळ एक अभ्यासक्रम नसून एक जीवनशैली आहे. सशस्त्र दलामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व युद्ध कौशल्य अवलंबल्यामुळे हुशार, सजग व शिस्तप्रिय तरुणांची गरज आहे. त्यामुळे आज एनसीसीची गणवेश परिधान केलेला प्रत्येक कॅडेट उद्या भारतीय लष्कराच्या गणवेशात दिसावा, हीच अपेक्षा आहे."
या प्रशिक्षण शिबिरात कॅडेट्सना फिजिकल ट्रेनिंग, शस्त्रप्रशिक्षण, फिल्ड व बॅटल क्राफ्ट, नकाशा वाचन, ड्रिल यांसारखे लष्करी विषय शिकवले जाणार आहेत. याशिवाय, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य व स्वच्छता, सामाजिक सेवा, राष्ट्रीय एकता, आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार यासारख्या उपयुक्त विषयांचाही समावेश आहे.
शिबिरात भारतीय लष्करातील अधिकारी, पर्मनंट इन्स्ट्रक्टर तसेच एनसीसी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सर्व प्रशिक्षण अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यावसायिक पद्धतीने दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या प्रसंगी नुकत्याच पार पडलेल्या इंटर गृप शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या कॅडेट गोविंद कलगुंडे याचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सुभेदार मेजर राजेश कुमार, सुभेदार श्रीकांत मोरे, सुभेदार मुकेश सिंग, सुभेदार राकेश कुमार, लेफ्टनंट डॉ. सुभाष आगळे, सेकंड ऑफिसर रविंद्र चोभे, थर्ड ऑफिसर पूजा पाटील, म्याना बाबूजी, प्रतिक शिंदे, नवनाथ जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सैन्य प्रशिक्षणाबरोबरच समाजसेवेचे मूल्यही शिकवले जात असून, त्यातून जबाबदार व देशभक्त नागरिक घडवण्याचे कार्य एनसीसीच्या माध्यमातून होत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com