सार्वजनिक रस्त्याचे नुकसान,अतिक्रमण करणाऱ्या वर कारवाईची मागणी

चिचोंडी पाटील-सांडवा रस्त्यावरील खड्ड्यांवरून ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलन


नगर : दर्शक । 


 चिचोंडी पाटील ते सांडवा-मांडवा या मार्गावरील जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर खड्डे खोदून रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. याविरोधात गावचे सरपंच शरद पवार, युवक प्रतिनिधी अक्षय कोळी व ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषद बांधकाम विभाग (दक्षिण) कार्यालयात ठिय्या आंदोलन करत संतप्त स्वरूपात आपला निषेध व्यक्त केला.



        तक्रारदार अक्षय कोळी यांच्या म्हणण्यानुसार, चिचोंडी पाटील येथील सुधीर राजाराम भद्रे या व्यक्तीने पाच ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने चर खोदले असून, त्यामुळे डांबरी रस्त्याचे गंभीर नुकसान झाले आहे. याशिवाय त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या चाऱ्या बुजवून, झाडांची तोडफोड करून, विटा-दगडांचे बांधकाम व पत्र्याचे शेड उभारून सरळ सरळ बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे.



       या प्रकारामुळे सांडवा व मांडवा गावात जाणाऱ्या नागरीकांना, शिवारकर्‍यांना, महिला भाविकांना, ज्येष्ठ नागरिकांना व विशेषतः दर महिन्याच्या पौर्णिमेला जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, अनेक नागरिक त्यात पडल्याचीही माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.



        या संदर्भात २९ एप्रिल २०२५ रोजी लेखी तक्रार देऊनही बांधकाम विभागाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनाचा मार्ग अवलंबला.



  सुधीर भद्रे याच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व अतिक्रमणप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा., रस्त्याच्या नुकसानीची चारपट भरपाई त्याच्याकडून वसूल करावी., अतिक्रमण हटवून रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा.



        आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र, कारवाई होत नाही तोपर्यंत ग्रामस्थांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे.