School Dindi |  आषाढी एकादशीनिमित्त चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचा भक्तिमय बाल दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

School Dindi | आषाढी एकादशीनिमित्त चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचा भक्तिमय बाल दिंडी सोहळा उत्साहात संपन्न







नगर -"मन पांडुरंग, जीवन अभंग..." या अभंगाच्या ओळी जणू विद्यार्थ्यांच्या ओठांवर नाचत होत्या आणि संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला होता. आषाढी एकादशीनिमित्त चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल, नगर यांच्या वतीने भव्य बाल दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला.




या सोहळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून सहभागी होत भक्तिरसात रंग भरले. शाळेपासून शमी गणपती मंदिर, दिल्ली गेट ते निलक्रांती चौक, अहिल्यानगर या मार्गावर टाळ, मृदुंग, लेझीम, ढोल-ताशा आणि अभंग गजरात ही बालदिंडी मार्गस्थ झाली. दिंडी मार्गावर अनेक पालक, नागरिक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले.





कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या सांस्कृतिक सादरीकरणामध्ये नृत्य, ढोल-ताशा, लेझीम आणि भक्तीगीतांचे प्रभावी सादरीकरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आणि समर्पित पद्धतीने सहभाग घेत संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. मागील चार वर्षांपासून शाळेत हा परंपरागत सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून विद्यार्थ्यांच्या मनावर श्रद्धा, शिस्त आणि संस्काराचे बिंब निर्माण करणारा उपक्रम ठरत आहे.





या कार्यक्रमासाठी मा. यशवंत डांगे (महानगर पालिका आयुक्त), मा. गिरिभाऊ जाधव (उपझोनल प्रमुख, शिवसेना - उद्धव गट), मा. संजय देशमुख (सीए), मा. आशाताई महादेव निमसे यांची विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाळेच्या संस्कारक्षम उपक्रमाचे अभिनंदन केले.





या दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन शाळेचे संचालक मा. संजय चव्हाण सर आणि सीईओ मा. अशोक सचदेव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन शिक्षिका सौ. रेवती किशोर पागा मॅडम यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षकांनी सजावट, पोशाख, मेकअप आणि सांस्कृतिक सादरीकरणासाठी विशेष मेहनत घेतली. विठ्ठलाच्या वेशभूषेत शाळेतील स्वरूप चव्हाण हा विद्यार्थी, तर रुक्मिणीच्या वेशभूषेत आराध्या भांडवलकर ही विद्यार्थिनी होती."





संपूर्ण दिंडी सोहळा विद्यार्थ्यांच्या सहभागाने आणि शाळेच्या टीमच्या उत्तम नियोजनामुळे एक संस्मरणीय, भक्तिमय आणि सांस्कृतिक पर्वणी ठरली. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभावासोबतच सामाजिक आणि आध्यात्मिक जाणीव जागृत होत असल्याचे या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनातून दिसून आले.