Ahmednagar college | अहमदनगर कॉलेजला उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार
नगर - क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यश, सातत्यपूर्ण कामगिरी व विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाच्या बळावर अहमदनगर कॉलेजने आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळ तसेच
नगर जिल्हा झोनल क्रीडा समिती तर्फे शैक्षणिक वर्ष 2024-25 या कालावधीतील उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार या मानाच्या सन्मानाने अहमदनगर कॉलेजला गौरविण्यात आले. तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या महाविद्यालयांमधून ही गौरवाची निवड करण्यात आली असून, कॉलेजच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कामगिरीची अधिकृत दखल घेतली गेली आहे.
हा पुरस्कार कॉलेजतर्फे प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे आणि क्रीडा संचालक डॉ. साविओ व्हिएगस यांनी औपचारिकरीत्या स्वीकारला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, प्राध्यापकांच्या समर्पित मार्गदर्शनाला व सर्व कर्मचारी वर्गाच्या सहकार्यास या पुरस्कारातून उचित मान्यता मिळाल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
हा पुरस्कार मिळल्याबद्दल अहमदनगर कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ. साविओ वेगस यांचा सत्कार बी.पी. हिवळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर.जे. बार्नबास यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्यांनी कॉलेजच्या क्रीडाक्षेत्रातील परंपरेचा गौरव करताना विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित केले.
कॉलेजमधील विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरमहाविद्यालयीन पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच हा सन्मान मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांसह क्रीडा विभागातील सर्व प्रशिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचे कौतुक होत असून, या पुरस्कारामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत अधिक जोश निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
अहमदनगर कॉलेजच्या या सन्मानामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, महाविद्यालयातील खेळाडूंमध्ये आगामी स्पर्धांसाठी नवीन उत्साह संचारला आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून अहमदनगर कॉलेजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com