संदेश नगरला वीर गोगादेव उत्सवात भक्तांची मांदियाळी
नगर – वीर गोगादेव यांच्या सन्मानार्थ उभारण्यात येणाऱ्या नाथांचे १३ मानांच्या काठ्या या भक्ती, एकता आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असून, या काठ्यांची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. या परंपरेमुळे समाजात एकतेची भावना वृद्धिंगत होते, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
या उत्सवात विविध आखाड्यांच्या मानाच्या काठ्यांचा भव्य सहभाग होता. यामध्ये गुरु गोरक्षनाथ आखाडा - संदीप करोलीया, एसटी कॉलनी - नरेश चौहान, सिद्धार्थ नगर आखाडा - व.दा.चावरे, माळीवाडा आखाडा - कुमार सारसर, सिद्धार्थ नगर - गणेश गुजर, बातरी - वीरू वस्ताद मेल- धरम छाजलानी, डीपू का राजा मेल - राजेश चौहान, ग्यारा भाई आखाडा मेल - जगदीश पुडिया, जमदार मेल - राजू नकवाल, रेल्वे स्टेशन भाई भाई आखाडा - शुभम दुग्गज, जुना निशान मेल - गुलाबजी गोहेर, नालेगाव आखाडा - अनिल वाणे, रतन वस्ताद मेल - रवी मोरकरोसे आदींचा समावेश होता.
सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक २ मधील संदेश नगर साई मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही तेरा मानांच्या काठ्यांचे आगमन झाले. यावेळी आ.जगताप यांच्या हस्ते काठ्यांची पूजा पार पडली. नगरसेवक सुनील त्र्यंबके, बबलू सूर्यवंशी, पुजारी,महाराज तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.जगताप म्हणाले, “या काठ्यांच्या माध्यमातून आपण वीर गोगादेवांच्या शौर्याला व त्यागाला वंदन करतो. त्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख, समृद्धी व शांती नांदते.भक्तांसाठी ही प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे.”
नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी सांगितले की, दरवर्षी शहराच्या विविध भागांतून या मानाच्या काठ्या संदेश नगरमधील साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या काठ्यांची भव्य मिरवणूक उपनगरातून काढण्यात येते. ही परंपरा पूर्वीपासून सुरू असून तिचा संबंध वीर गोगादेवांच्या इतिहासाशी आहे. त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. कार्यक्रमानंतर नगरसेवक त्र्यंबके यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
युवा नेते अक्षय कर्डिले यांनीही उपस्थित राहून त्र्यंबके यांच्या धार्मिक कार्यातील योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात, हरिनामाच्या गजरात व पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या मानाच्या काठ्यांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीतून सर्वधर्मसमभाव, एकता आणि समाजबंधुतेचा संदेश दिला गेला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com