माळीवाडा भागातील सौभाग्य सदन मंगल कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी – अॅड. अमोल निस्ताने यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

Soubhagya Sadan | सौभाग्य सदन मंगल कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी निस्ताने यांचे पालकमंत्र्यांना निवेदन






नगर : दर्शक । 


प्रभाग क्र. 12 मधील माळीवाडा भागात असलेले सौभाग्य सदन मंगल कार्यालय हे स्थानिकांसाठी महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असले तरी सध्या त्याची दुरवस्था झाल्यामुळे तेथील वापरावर मर्यादा आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी अॅड. अमोल निस्ताने यांनी राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.





अॅड. निस्ताने यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सौभाग्य सदन हे परिसरातील नागरिक, महिला आणि विविध संघटनांसाठी एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे. येथे लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम आणि लहानमोठ्या बैठका आयोजित केल्या जातात. मात्र, सध्या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून, फर्शी बसविणे, संडास व बाथरूम दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच पत्र्याचे शेड दुरुस्त करणे अशी अत्यावश्यक कामे करणे गरजेचे आहे.निस्ताने यांनी सांगितले,





“या दुरुस्त्या झाल्यास सौभाग्य सदन हे महिलांसाठी व नागरिकांसाठी अधिक सोयीचे आणि उपयुक्त ठिकाण ठरेल. या ठिकाणी मंगल कार्यालय अथवा महिलांसाठी मेडिटेशन हॉल व योगा हॉल म्हणून देखील उपयोग करता येईल व तसेच या ठिकाणी  स्टार्ट अप इंडिया च्या माध्यमातून  महिलांसाठी सक्षमीकरण केंद्र देखील  होऊ शकते  या कामांसाठी एकूण 30 लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर व्हावा अशी आमची मागणी आहे. प्रभाग 12 मधील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा प्रतिसाद दिला असून, सौभाग्य सदनचे सुशोभीकरण झाल्यास आगामी महापालिका निवडणुकीतही भाजपाला याचा फायदा होईल,” असे ते म्हणाले.





अॅड. निस्ताने हे प्रभाग क्र. 12 चे रहिवासी असून, त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत या प्रभागाची जबाबदारी सांभाळली होती. या भागात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून स्थानिकांचा विश्वास जिंकला आहे. आता त्यांनी घेतलेली ही पुढाकार नागरिकांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच परिसरात सौंदर्यवर्धन घडवून आणणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.