नवनवीन विद्यार्थी घडविणे शिक्षकांपुढे मोठे आव्हान – डॉ. रेखाराणी खुराणा
"शिक्षकांचा त्याग व समर्पण हा राष्ट्र उभारणीचा पाया आहे. आज विद्यार्थी शिक्षकांचे बोलणे कमी ऐकतात कारण संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान सहज उपलब्ध झाले आहे. जे बदलाला तयार होत नाहीत त्यांची प्रगती होत नाही. त्यामुळे काळानुसार बदल स्वीकारून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांपुढे मोठे आव्हान आहे," असे प्रतिपादन डॉ. रेखाराणी खुराणा यांनी केले.
सारक मंडळाच्या डॉ.ना. ज.पाऊलबुधे शैक्षणिक संकुलात शिक्षक दिनानिमित्त संस्थेच्या १३ युनिटमधील सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. युनिट मधील सर्व शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे आज संस्था नावारुपास आली आहे.त्यामुळे सर्व शिक्षकांचा एकत्रित सन्मान करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विनय पाऊलबुधे यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
डॉ. खुराणा पुढे म्हणाल्या की, "शिक्षकांनी केवळ ज्ञान द्यायचे नसून विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, मूल्यनिष्ठा व सामाजिक जबाबदारी शिकवली पाहिजे. समाज बदलत असला तरीही शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज कायम असते. विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कल्पनाशक्ती रुजवून त्यांना समाजाभिमुख बनविणे हे आजच्या शिक्षकांचे कर्तव्य आहे."
या वेळी संकुलाच्या सेवानिवृत्त प्रमुख डॉ. रेखाराणी खुराणा, मंडळाचे उपाध्यक्ष रामभाऊ बुचकूल, सहसचिव रामकिसन देशमुख, खजिनदार दादासाहेब भोईटे, प्राचार्य डॉ.श्याम पंगा, बाळासाहेब बोर्डे,प्राचार्या अनुराधा चव्हाण, विजया नवले, मुख्याध्यापिका अनिता सिद्दम,मीरा नराल, अंजली सिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
सहसचिव रामकिसन देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "संस्थेच्या प्रगतीत शिक्षकांचे योगदान सर्वाधिक आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हे आमच्या शिक्षकांमुळे शक्य झाले आहे. संस्थेच्या सर्व युनिट्सनी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून हा अभिमानाचा विषय आहे." "विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान कायम राखला पाहिजे.
शिक्षकांच्या आशीर्वादानेच विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. शिक्षक दिनाचा हा सन्मान सोहळा म्हणजे संस्थेच्या प्रत्येक शिक्षकाबद्दल कृतज्ञतेचा लहानसा प्रयत्न आहे."असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले. या सन्मान सोहळ्यात युनिटचे बी.फार्मसी, एम. फार्मसी, बी.एड., महिला महाविद्यालय, रात्र महाविद्यालय, व्यवस्थापन पदविका, पॉलिटेक्निक, डी. फार्मसी, डी.एड., माध्यमिक विद्यालय, जुनियर कॉलेज,
श्री. महंत पंडित सुच्चा सिंग महाराज विद्यालय, श्री.नाथ विद्या मंदिर, श्री. मनोहरलाल रामचंद सबलोक प्राथमिक विद्यालय आदी युनिट्समधील सर्व शिक्षकांचा एकत्रित सन्मान सोहळा पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विनय पाऊलबुधे यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. या वेळी विद्यार्थ्यांनी देखील गुलाब पुष्प देऊन आपल्या गुरुजनां विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्राची मचे यांनी केले तर सर्वांचे आभार डॉ.रोशनी सूर्यवंशी यांनी मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com