जिल्हा त्रिसदस्यीय समितीची मान्यता, पुढील न्यायालयीन प्रक्रिया केली सुरू
नगर : दर्शक |
गणेशोत्सवाच्या काळात सप्टेंबर महिन्यात मुंबई येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्यासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समारोपात मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष व नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून,
नगर जिल्ह्यात मागच्या 2024 वर्षात झालेल्या आंदोलनांबद्दल दाखल गुन्ह्यांपैकी 11 गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीने पात्र केले आहेत. त्यांची पुढील न्यायालयीन प्रक्रियाही पोलिसांद्वारे सुरू करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये कोपरगाव, नगर एमआयडीसी, भिंगार कॅम्प व श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन तर कोतवाली, शेवगाव व श्रीरामपूर पोलिस ठाण्यांतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. दरम्यान, मागे घेण्यास पात्र 11 गुन्हे वगळता अन्य गुन्हेही मागे घेण्याबाबत समितीद्वारे तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे, या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत पाच दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने तसा निर्णय घेतला व हैदराबाद गॅझेटीयरमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरणाचा आदेश काढून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुंबई उपोषणाच्या सांगतेच्यावेळी दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन जरांगे पाटील यांना दिले होते. त्यानुसार त्रिस्तरीय समिती स्थापन करून दाखल गुन्ह्यांची तपासणी करण्यात आली व या तपासणीनंतर 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र ठरवले गेले आहे.
2024मध्ये दाखल या गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे गुन्हे मागे घेण्यास पात्र ठरल्याने पुढील न्यायालयीन प्रक्रिया केली जाणार आहे. भारतीय दंड विधान कलम 341, 143, 188 तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37 (1) 135, 37 (1) (3) 135 व 37 (1) (3) आदी कलमांन्वये हे गुन्हे दाखल होते.
मागे घेण्यास पात्र ठरलेल्या 11 गुन्ह्यांमध्ये श्रीरामपूर तालुका पोलिस ठाणे (क्रमांक 85-2024), कोपरगाव शहर पोलिस ठाणे (84-2024), कोपरगाव तालुका पोलिस ठाणे (52-2024), भिंगार कॅम्प पोलिस ठाणे (171-2024) व भिंगार कॅम्प पोलिस ठाणे (172-2024), कोतवाली पोलिस ठाणे (213-2024), एमआयडीसी पोलिस ठाणे (171-2024), एमआयडीसी पोलिस ठाणे (172-2024), श्रीगोंदा पोलिस ठाणे (215-2024), श्रीगोंदा पोलिस ठाणे (216-2024) व शेवगाव पोलिस ठाणे (155-2024) या गुन्ह्यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळाने केली चर्चा
जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्याच्या वेळी सरकारने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दिलेल्या शब्दाप्रमाणे आंदोलनादरम्यान मराठा समाजातील बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीच्या अनुषंगाने नगर सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नुकतीच भेट घेतली व जिल्ह्यातील सर्व मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासंदर्भात चर्चा केली.
त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे यांनी त्रिसदस्य समिती गठीत करून गुन्हे माघारी घेण्याची प्रक्रिया केली आहे व त्यानुसार जिल्ह्यातील साधारण 11 पोलिस ठाण्यांतील गुन्हे तपासून माघारीची प्रक्रिया सुरू आहे व बाकीच्या राहिलेले गुन्ह्यांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती दिली. या कार्यवाहीबद्दल सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने कृतज्ञता व्यक्त केली.
या शिष्टमंडळात नगर सकल मराठा समाजाच्यावतीने अॅड. अनुराधा येवले, अॅड गजेंद्र दांगट, अॅड हरीश भामरे यांच्यासह मदन आढाव, वैभव भोगाडे, स्वप्निल दगडे, अभय शेडगे, निलेश सुबे, राम जरांगे, संदीप जगताप, प्रमोद कोरडे, सिद्धांत पानसरे, भारत भोसले, रमेश मुंगसे, सागर भोसले, जगन्नाथ निमसे, सोमनाथ गुंड, राम सातपुते आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com