Nagar Sports | नगरच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर चमक – चार सुवर्णपदकांची कमाई

  Nagar Sports |  आदिश तानपुरे, किशोर शिंदे, अमोल गायकवाड, देवदत्त गुंडू या खेळाडूंनी जिंकले सुवर्णपदक

नगरच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर चमक – चार सुवर्णपदकांची कमाई




Nagar Sports |  नगर : दर्शक 
 नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या WRPF तर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये नगरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण चार सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत खेळाडूंमध्ये अहिल्यानगरच्या खेळाडूंनी आपल्या ताकदीचा ठसा उमटवत अभिमानास्पद यश संपादन केले.



       या स्पर्धेत आदिश तानपुरे यांनी सब ज्युनिअर 100 किलो गटात सुवर्णपदक मिळवले, तर किशोर शिंदे यांनी मास्टर 1 कॅटेगरीत 80 किलो गटात सुवर्णपदक पटकावले. अमोल प्रभाकर गायकवाड यांनी सीनियर 100 किलो गटात सुवर्णपदक जिंकत राज्याचे नाव उंचावले. तसेच देवदत्त प्रविण गुंडू यांनी सीनियर 125 किलो गटात जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या चौघांनी मिळवलेल्या सुवर्णपदकांमुळे नगर जिल्ह्याचा क्रीडा विश्वात गौरव झाला आहे.



     या सर्व खेळाडूंना नगरचेच आंतरराष्ट्रीय चॅम्पियन देवदत्त प्रविण गुंडू यांनी प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी नियमित सराव करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक तयारी केली होती. देवदत्त गुंडू यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धतीमुळेच हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करू शकले, असे मत क्रीडाविश्वात व्यक्त होत आहे.



      या विजयी खेळाडूंनी आपला सराव नगर येथील अजिंक्य’ज फिटनेस वर्ल्ड जिम मध्ये केला होता. येथे सातत्याने प्रशिक्षण घेऊन त्यांनी शारीरिक व मानसिक तयारी साधली. खेळाडूंच्या मेहनतीला आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाला अखेर यश मिळाले असून नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.



      या विजयानंतर सर्व विजेत्या खेळाडूंनी WRPF महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री. सौरभ चौधरी सर व शीतल मॅडम चौधरी, तसेच WRPF इंडिया चे अध्यक्ष श्री. सुनील लोचाब सर यांचे विशेष आभार मानले आहेत. त्यांच्या प्रोत्साहनामुळे व संघटनेच्या पाठबळामुळेच राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा गाठता आली, असे खेळाडूंनी सांगितले. या कामगिरीमुळे नगरचा क्रीडाक्षेत्रातील दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या