Divyang Nagar | वसंत शिंदे यांच्या प्रयत्नातून दिव्यांगाच्या चेहऱ्यावर परतले हसू
नगर – तालुक्यातील रहिवासी असलेले दिव्यांग शिवाजी जवरे हे एक पाय नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय सवलती आणि सुविधांपासून वंचित राहिले होते. हालचाल करणे कठीण झाल्याने कोणत्याही कार्यालयात जाणे शक्य नव्हते. त्यामुळे दिव्यांग सर्टिफिकेटपासून ते मदतीच्या विविध योजना या सर्वच गोष्टींपासून ते दूर राहिले.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावे पूरग्रस्त झाली होती. या भागांची पाहणी करत असताना आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी पाथर्डीतील दौऱ्यात दिव्यांग शिवाजी जवरे यांची आपुलकीने विचारपूस केली. जवरे यांनी आपल्या अडचणी सांगितल्यानंतर आमदार कर्डीले साहेब भावुक झाले.
त्यांनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यक अमोल धाडगे यांना संपर्क साधण्याचे निर्देश देऊन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांना या प्रकरणी तातडीने मदत करण्यास सांगितले. “या दिव्यांग बांधवाला सर्वतोपरी मदत मिळालीच पाहिजे, कुठे अडचण आली तर मला थेट फोन करा,” अशी सूचना आमदार कर्डीले यांनी दिली.
आमदारांच्या सूचनेनंतर भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे, महिला अध्यक्षा आशाताई गायकवाड, जिल्हा उपाध्यक्षा विजयाताई बडे, उपाध्यक्ष चंद्रकांत काळे, ईश्वर गुंड तसेच तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे, संजय गांधी निराधार अनुदान समिती नगर तालुका सदस्य श्री. बाबासाहेब धिवर, यांनी तातडीने काम हाती घेतले. त्यांनी शिवाजी जवरे यांच्याशी संपर्क साधून प्रथम ऑनलाईन दिव्यांग सर्टिफिकेट काढून देण्यास मदत केली. त्यानंतर डॉ. विखे पाटील हॉस्पिटल येथून जयपूर फुटवेअरचा कृत्रिम पाय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. या कामात डॉ. आनाप यांचे विशेष सहकार्य लाभले.
काही दिवसांच्या प्रयत्नानंतर दिव्यांग शिवाजी जवरे यांना जयपूर फुटवेअरचा एक पाय बसविण्यात आला. चालण्यास सक्षम झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलले. “आमदार कर्डीले साहेब आणि वसंत शिंदे सर नसते तर हे शक्य झाले नसते. आता मी पुन्हा चालू शकतो, हे माझ्यासाठी नवजीवन आहे,” असे जवरे यांनी सांगितले.
या कार्यामुळे आमदार शिवाजीराव कर्डीले आणि वसंत शिंदे यांचे समाजातील संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मानवीतेच्या भावनेतून केलेले हे काम पाथर्डी परिसरात चर्चेचा विषय ठरले असून समाजातही सकारात्मकतेचा संदेश देणारे उदाहरण ठरले आहे.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com