Manasgram Nagar | मानसिक रुग्णांची भारतातील अनास्था चिंताजनक
Manasgram Nagar | नगर : दर्शक ।
भारताच्या सर्वांगीण सामर्थ्याचा कर्णभेदी डंका सध्या वाजवला जात आहे. तथापि रस्त्यांवर बेवारस फिरणाऱ्या सुमारे 20 लाख रुग्णांची दुरावस्था आणि कोट्यावधींची मानसोपचारांच्या अभावी होणारी परवड आपल्या माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, असे प्रतिपादन डॉ. भरत वटवानी यांनी केले. मानसिक अन आरोग्यामुळे उद्भवलेल्या बहुविध समस्यांनी भारत ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्याचा इशारा डॉ.वटवानी यांनी दिला.
जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून स्नेहालय संस्थेच्या मानसग्राम प्रकल्पाच्या 5 एकर क्षेत्रावर 45 हजार चौरस फुटांच्या नूतन संकुलाचे लोकार्पण आज झाले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ,रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित मानसोपचार तज्ञ डॉ.वटवानी उपस्थित होते.
मागील 6 वर्षातील मानसग्राम प्रकल्पाची वाटचाल पाहता येथे पुढील दशकात मानसिक आरोग्याची पंढरी निर्माण होईल, अशी आशा डॉ.वटवानी यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्रकल्प पालक दानिश शहा ( पुणे), तहसीलदार संजय शिंदे ,नायब तहसीलदार अभिजीत वांडेकर आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले संस्थाचालक आणि मानसोपचार तज्ञ यावेळी उपस्थित होते.
पहिलाच बहुउद्देशीय प्रकल्प
या उपक्रमाचे वैद्यकीय संचालक डॉ. नीरज करंदीकर यावेळी म्हणाले की,मानसिक आरोग्यावरील स्वयंसेवी संस्थेचा नगर जिल्ह्यातील हा पहिलाच बहुउद्देशीय प्रकल्प आहे. व्यसनमुक्तीसह बहुविध मानसिक आरोग्यसेवा एकाच छताखाली येथे गरीब रुग्णांना उपलब्ध झाल्याची माहिती मानद संचालक मानसोपचार तज्ञ डॉ.नीरज करंदीकर यांनी दिली .
भारतातील तसेच नेपाळ आणि बांगलादेश मधील सुमारे 400 रुग्णांचे या प्रकल्पाने त्यांचे कुटुंब शोधून त्यातच पुनर्वसन केले.वैद्यकीय उपचारानंतर रुग्णांचे त्यांच्या कुटुंबातच पुनर्वसन करणारा आणि बऱ्या झालेल्या रुग्णांना मानसिक आजाराची औषधे घरपोच पाठवणाऱ्या या प्रकल्पाची रुग्णसंख्या आता 50 वरून 250 झाली आहे. 30 रुग्णक्षमतेच्या डॉ. जयंत करंदीकर स्मृति मनोबल व्यसनमुक्ती केंद्राची निवासी क्षमता 30 वरून 50 झाली आहे. विविध मानसिक आजारांचे साप्ताहिक आधार गट, माईंडफूलनेस - कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी - रॅशनल इमोशनल बिहेवियर थेरपी असे विविध मानसिक आरोग्य प्रशिक्षण येथे सर्वांसाठी उपलब्ध झाले असल्याचे डॉ. करंदीकर यांनी यावेळी नमूद केले.
मानसग्रामच्या उभारणीत मुंबईतील जमशेद, नवरोझ आणि नाझनीन बिलिमोरीया यांनी त्यांचे आई-वडील श्रीमती माकी सिधवा आणि रुसी बिलीमोरीया यांच्या स्मरणार्थ प्राथमिक आर्थिक सहयोग दिला. त्यामुळे या संकुलास. बिलीमोरिया - सीधवा व्यसनमुक्ती आणि मनोयात्री पुनर्वसन संकुल असे नाव देण्यात आल्याचे स्नेहालय च्या सचिव डॉ. प्रीती भोम्बे यांनी यावेळी सांगितले.
मानसिक आरोग्यासाठी वज्रमूठ
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की, 27 प्रकारची सेवाकार्य उच्च गुणवत्तेने स्नेहालय विकसित करीत आहे.तसेच अन्य शेकडो संस्थांचाही क्षमता विकास करणारी स्नेहालय ही अद्वितीय संस्था आहे.
नगर जिल्ह्यातील सर्व मानसोपचार तज्ञ ,जिल्हा शासकीय रुग्णालयाचा मानसोपचार विभाग, जिल्हा परिषदेची ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र , मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्ते यांच्या संघटन आणि समन्वयातून अहिल्यानगर हा देशातील पहिला *मनोयात्री स्नेही जिल्हा* करण्यासाठी मानसग्रामने पुढाकार घ्यावा असे श्री भंडारी म्हणाले.
श्री घारगे म्हणाले की,प्रत्येक समस्येसाठी समाजातून पोलिसांकडे मदत मागितली जाते. मनोयात्रींसाठी मानसग्रामचा प्रतिसाद अत्यंत तत्पर असतो. त्यांच्या मदतीने मनोयात्रींच्या मानवाधिकारांचे रक्षण करणे पोलिसांना शक्य होते. व्यसनांची सार्वजनिक उपलब्धता आणि मनोरुग्णांच्या बहुविध प्रश्नांच्या हाताळणीसाठी मानसग्रामच्या मदतीने प्रशिक्षण आणि कृती कार्यक्रम आयोजित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
श्री दानिश शहा म्हणाले की,येथील प्रकल्पात भाजी, दूध उत्पादन , कृषी प्रशिक्षण इ. दिले जात असल्याने रुग्णांना कुटुंबात आणि समाजात स्वावलंबी जीवन जगणे सोपे जाते,या प्रकल्पाचा आराखडा तयार करणारे नाशिक येथील आरीन डिझाईनचे आर्किटेक्ट आर्चीस कुलकर्णी , सौ. अपूर्वा आणि वरुण देवगावकर, बांधकाम करणाऱ्या अर्णव कन्स्ट्रक्शनचे कमलेश पितळे आणि अनिकेत कौर , बेवारस मनोरुग्णांना बुलढाणा जिल्ह्यात सांभाळणारे दिव्य फाउंडेशनचे अशोक काकडे, जालना जिल्ह्यातील मनमंदिर प्रकल्पाचे माधवराव पवार, बारामती येथील 140 मनोरुग्णांना घरी पाठवणारे मनोबल आसरा फाउंडेशन संस्थेचे राजू गावडे आदींना यावेळी गौरविण्यात आले.
सौ.स्वाती रानडे यांनी सूत्रसंचालन केले.रस्त्यांवरील बेवारस मनोरुग्ण किंवा व्यसनमुक्तीसाठी 7770027505 येथे संपर्काचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com