Snehalay | स्नेहालय संस्थेने वंचित भगिनींसाठी दिवाळीत माहेरची साडी उपक्रमाचे आयोजन
Snehalay | नगर : दर्शक ।
मागील दोन दशकांच्या परंपरेनुसार यंदाही स्नेहालय संस्थेने वंचित भगिनींसाठी दिवाळीत माहेरची साडी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
दिवाळीत आपल्या आप्तस्वकीयांना भेटून भेटवस्तू ,फराळाचे पदार्थ, मिठाई देण्याची आपली परंपरा आहे. ज्यांना भाऊ आणि माहेर असते अशा माता-भगिनींसाठी दिवाळीमधील भाऊबीजेचा दिवस अगदी खास असतो. प्रेमाचे प्रतिक असणारे वस्त्र आणि मिठाई त्यांना परंपरेने आपल्या भावाकडून दिली जाते. परंतु ज्यांना कोणीही भाऊ अथवा नातेवाईक नसतो, अशा माता - भगिनींसाठी मात्र दीपोत्सव दु:ख आणि निराशेने भरलेला असतो. अशा माता-भगिनींना माहेरची साडी भाऊबीजेनिमित्त देण्याचा उपक्रम अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या वतीने 20 वर्षांपूर्वी सुरू झाला.
सामाजिक कार्यकर्ते स्व. धर्मराज शंकर औटी गुरुजींची प्रेरणा आणि प्रयत्न यांमागे होती. स्व. औटी गुरुजी यांचे निधन झाले. ते स्वतः गरीब ,कष्टकरी आणि वंचित समूहातील महिलांसाठी सहृदयी भाऊ शोधून एकेक नवीन साडी गोळा करीत. औटी गुरुजी यांचे निधन झाले असले तरी त्यांनी सुरू केलेली माहेरच्या साडीची परंपरा यापुढे कायम चालविण्याचा संकल्प अभंग प्रतिष्ठान, देहू या सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक आणि स्नेहालयचे विश्वस्त किरिटी मोरे यांनी केलेला आहे.
मिळालेली माहेरची साडी ही महिलांसाठी केवळ नवे कापड नसते, तर ती जगण्याची उमेद आणि नवी आशा असते. मागील वर्षी प्रमाणे या वर्षीदेखील या भाऊबीजेच्या उपक्रमात आपण सहभागी होऊन किमान एक माहेरची साडी आपल्या या भगिनिंसाठी द्याल असा आम्हास विश्वास आहे. दिवाळी-भाऊबीज निमित्त वंचित समूहातील भगिनींना देण्यासाठी स्नेहालय परिवार आणि अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com