Bhagyoday School Nagar | भाग्योदय विद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
नगर : दर्शक ।
भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर “स्थानिक इतिहास आणि यातील प्रेरणा” या विषयावर प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड, रेणुका माता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे, डॉ. कदम, गोविंद साहेबराव कार्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. वाव्हळ यांनी आपल्या प्रभावी भाषणात विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहासातील प्रेरणादायी घटना आणि पुराव्यांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मध्ययुगीन काळातील केडगावची वेश स्थापत्यशैलीच्या दृष्टिने वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्वातंत्र्य संग्रामात केडगाव ग्रामस्थांनी सहभाग नोंदविल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. शिवकालीन इतिहासात पारनेर नावाचा परगणा असून त्यात २२ गावे होती आणि शेवटचे गाव केडगाव होते, अशी नोंद त्यांनी विद्यार्थ्यांसमोर ठेवली.
ते पुढे म्हणाले की, इ.स. १४९२ ते १४९४ या कालखंडात अहमदनगर शहर वसले असून त्या काळी अहमदनगरला बगदाद आणि कैरो या शहरांप्रमाणेच ख्याती होती. इ.स. १४०४ ते १६३५ या काळात अहमदनगरचा भुईकोट किल्ला तुरुंग म्हणून वापरला जात होता. याच किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना आझाद यांना कैद करण्यात आले होते. पुढे इ.स. १७८८ मध्ये हा किल्ला शिंदे यांच्या ताब्यात आला, अशी ऐतिहासिक माहितीही त्यांनी दिली.
अहिल्यानगरमधील फरिया बाग, चांदबिबी महाल, भाग रोजा, हडको माळीवाडा वेश, दिल्ली गेट आणि दगडी मशीद या ऐतिहासिक वास्तूंचा कालखंड, त्यातील पराक्रम आणि सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांसमोर डॉ. वाव्हळ यांनी प्रभावीपणे मांडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. कदम यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय पांडोळे यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय बारगळ यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षकवर्गातील सोपान तोडमल, गोरक्ष कांडेकर, एकनाथ होले, संतोष काकडे, मेढे सुनीता गणेश गायकवाड, बाळू कावरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com