Nagar Sports | जिल्ह्यातून राज्यस्तरावर पोहचणारा एकमेव विद्यार्थी
नगर : दर्शक ।
येथील समर्थ विद्या प्रशालेतील विद्यार्थी सात्विक निशांत दातीर याने क्रीडा क्षेत्रात भक्कम पाऊल टाकत 14 वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी निवड होणारा सात्विक हा एकमेव विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीने जिल्ह्याची क्रीडा परंपरा उज्वल केली असून विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यापूर्वी कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या पुणे विभागीय शालेय रग्बी स्पर्धेत सात्विकने विशेष प्राविण्य प्राप्त केले. विभागीय स्तरावरील त्याच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याची ठाणे जिल्ह्यातील शहाड येथील सेंचुरी रेहान हायस्कूल येथे होणार्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
ही राज्यस्तरीय स्पर्धा दि.23 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून यानंतर देश पातळीवरील संघाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे सात्विकला राष्ट्रीय स्तरावरही चमक दाखविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. सात्विकच्या यशामागे समर्थ विद्यामंदिर प्रशालेतील प्रशिक्षकांचे महत्त्वाचे योगदान आहे.
संस्थेच्या मुख्याध्यापिका वसुधा जोशी व क्रीडा शिक्षक पोपट लोंढे यांनी सातत्याने मार्गदर्शन करून त्याची क्षमता घडवली. शाळेच्या क्रीडा विभागाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे सात्विकने आपली कामगिरी अधिक परिणामकारकपणे सिद्ध केली आहे.
सात्विक हा जेष्ठ पत्रकार निशांत दातीर व पुण्यश्लोक महिला बचत गटाच्या अध्यक्षा इंजि. शोभा दातीर यांचा मुलगा असून कुटुंबाने सातत्याने पाठिंबा व उत्तम वातावरण दिल्यामुळे सात्विकला क्रीडा क्षेत्रात प्रगती करता आली. त्याच्या या यशाची दखल घेत राज्याचे विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारण्याच्या तयारीत असलेल्या सात्विककडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत असून जिल्ह्यातील क्रीडा रसिकांचे लक्ष आता त्याच्या पुढील कामगिरीकडे लागले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com