राज्यस्तरावर 17 स्पर्धकांची निवड
नगर : दर्शक ।
भगवद्गीतेचे मानवी जीवनात अतुलनीय असे महत्त्व आहे. व्यक्तिमत्व विकासातून देशाचा विकास साधायचा असेल तर बालवयापासून सुसंस्कारांची पेरणी होणे आवश्यक आहे. गीता वाचणे, पाठांतर करणे आणि पारायण करणे ही आजच्या युगाची अपरिहार्यता आहे. या अनमोल ज्ञानाचा प्रसार-प्रचार करणे हेच चिन्मय मिशनचे प्रमुख कार्य असून ‘अधिकाधिक लोकांना अधिकाधिक आनंद देणे’ हा मंत्र घेऊन मिशन सातत्याने समाजासाठी कार्यरत आहे.असे प्रतिपादन स्वामी प्रत्ययानंद सरस्वती यांनी केले.
चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जगभरातील सुमारे ४०० शाखांमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गीता पाठांतर स्पर्धांचे रम्य आयोजन करण्यात आले. त्यानुसार चिन्मय मिशन अहिल्यानगरमार्फत लहान बालकांपासून ते तरुण मुलामुलींपर्यंत भगवद्गीतेची ओळख व्हावी, त्यांच्या मनामध्ये अध्यात्मिक मूल्ये जोपासली जावीत, या उद्देशाने भगवद्गीता पंधरावा अध्याय पाठांतर स्पर्धा मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये चिन्मय मिशन बाल संस्कार वर्ग, ज्ञानेश्वर आश्रम डोंगरगण, तसेच जिल्ह्यातील इतर पाच शाळांमधील जवळपास 450 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
प्रथम शालेय स्तरावर 450 स्पर्धकांची परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरावर 63 स्पर्धकांची निवड झाली. त्यापैकी 17 स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होऊन 2 नोव्हेंबर रोजी पुणे येथे राज्यस्तरावरील अंतिम फेरी यशस्वीरीत्या पार पडली.यामधून सहा स्पर्धकांनी उल्लेखनीय कामगिरी करत उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली. या मधे सहा विजेते स्पर्धक वेदांत वैभव दराडे, गिरीजा महेश सुरडे, तनुजा महेश सुरडे, श्रावणी संजय आंधळे, ज्ञानदा कृष्णा जाधव, ज्ञानवी अनिरुद्ध गायके या सर्व स्पर्धकांचे स्वामी प्रत्ययानंद सरस्वती तसेच सर्व पालक आणि केंद्रामार्फत मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले.
सर्व स्पर्धकांचा सत्कार सोहळा नुकताच सावेडी उपनगरात पाईपलाईन रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठ्या थाटामाटात पार पडला. शालेय व जिल्हास्तरावर यश मिळवलेल्या सर्व बालस्पर्धकांचा नांदेड येथील चिन्मय मिशनचे प्रमुख स्वामी प्रत्ययानंद सरस्वती यांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला चिन्मय मिशनचे अध्यक्ष धोंडीराम घोरपडे, बाल संस्कार वर्गाच्या श्रीमती विद्याताई हारदे,सुजाता टापरे,मंगला अष्टेकर,सचिव देवराम मोरे, खजिनदार उत्तमराव साळुंके, उपाध्यक्ष रामचंद्र शिर्के, एस.के. गायकवाड, सहसचिव व्ही.बी. दळवी, शिवाजीराव ढोले, रावसाहेब निमसे, भाऊसाहेब घनदाट, खंडेराव मगर, देवी ग्रुपच्या सर्व महिला सदस्य तसेच पालक वर्ग अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचा समारोप सर्व यशस्वी स्पर्धकांचे कौतुक,अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com