Top News

homeopathy ‘डाऊट्स टू मास्टरी ऑन क्लासिकल होमिओपॅथी’ चर्चासत्र उत्साहात

 homeopathy   तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन; १२० डॉक्टर व विद्यार्थ्यांची उपस्थिती

homeopathy ‘डाऊट्स टू मास्टरी ऑन क्लासिकल होमिओपॅथी’ चर्चासत्र उत्साहात





नगर : दर्शक । 


होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल ह्यनिमन यांच्या जन्मदिनानिमित्त १० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर तसेच होमिओपॅथिक हॉस्पिटलचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले पिंपरी (पुणे) येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांच्या प्रेरणेने कार्यरत असलेल्या मिशन होमिओपॅथी, नगर या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘डाऊट्स टू मास्टरी ऑन क्लासिकल होमिओपॅथी’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. हे चर्चासत्र  उत्साहात पार पडले.




          या चर्चासत्राचे उद्घाटन माऊली सेवा प्रतिष्ठान, मनगाव (अहिल्यानगर) चे संचालक डॉ. राजेंद्र धामणे व अरुणोदय औषधालय, अहिल्यानगर चे संचालक श्री. उदय भणगे यांच्या हस्ते करण्यात आले.



          उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. राजेंद्र धामणे म्हणाले की, डॉ. अमरसिंह निकम यांनी सुरू केलेले मिशन होमिओपॅथी हे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. ही चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी डॉ. निकम यांचे शिष्य अहिल्यानगर येथे टीम मिशन होमिओपॅथीच्या माध्यमातून जोमाने कार्य करत आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आजच्या काळात क्लासिकल होमिओपॅथीचा प्रसार होण्यासाठी आणि समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा प्रचार व्हावा यासाठी अशा प्रकारची चर्चासत्रे व कार्यशाळा वेळोवेळी घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी मिशन होमिओपॅथी टीमने मनगाव प्रकल्पातील मनोरुग्ण व लहान बालकांवर होमिओपॅथी उपचार सुरू करावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.



             यावेळी  उदय भणगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, टीम मिशन होमिओपॅथी, अहिल्यानगर यांचे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. मी देखील या टीमचा एक भाग म्हणून गेल्या चार वर्षांपासून कार्य करीत असून त्याचा मला विशेष आनंद होत आहे.



           या विशेष क्लासिकल होमिओपॅथी सेमिनारसाठी सोलापूर येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ. मयूर काकडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच इतर वक्त्यांमध्ये कोपरगाव येथील होमिओपॅथिक तज्ञ डॉ. शितलकुमार सोनवणे व अहिल्यानगर येथील होमिओपॅथिक तज्ञ डॉ. साईनाथ चिंता यांचीही व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.






         या सेमिनारसाठी अहिल्यानगर येथील काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय तसेच अहमदनगर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या चर्चासत्रासाठी कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज तसेच नेवासा फाटा येथील अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथील विद्यार्थी व शिक्षकांनीही सहभाग नोंदविला.



        या चर्चासत्रात तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांनी लिव्हर सिरोसिस, मिनिअर्स डिसीज, स्पायनल कॉर्ड डिसीज (कॉर्ड कॉम्प्रेशन), निमोनिया, मलेरिया, सोरीयासिस यांसारख्या असाध्य आजारांवर होमिओपॅथी उपचारांचे होणारे फायदे उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच अशा उपचारासाठी अभ्यासपूर्वक आणि निरीक्षणपूर्वक रुग्णाचे परीक्षण करणे किती महत्त्वाचे आहे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या चर्चासत्राचा लाभ घेण्यासाठी सुमारे १२० डॉक्टर व विद्यार्थी उपस्थित होते.





दरवर्षीप्रमाणे कै. अशोकराव जंगले पाटील व पोपटराव जंगले पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृती गौरव पुरस्कार मिशन होमिओपॅथीतर्फे प्रदान करण्यात येतो. यावर्षीचा स्मृती गौरव पुरस्कार २०२६ हा अंतिम वर्षात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थिनी डॉ. वैष्णवी मावळे व डॉ. तनिशा परदेशी तसेच उदयोन्मुख होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. पूजा काशिद यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.




        या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी टीम मिशन होमिओपॅथीचे डॉ. अनिल नवथर, डॉ. संकेत लांडे, डॉ. सचिन ठाणगे, डॉ. सुनिता चिंता, डॉ. रूपाली जंगले, डॉ. आकांक्षा लांडे व डॉ. बाळकृष्ण जवरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश जंगले यांनी केले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने