Nagar Collector On Gas Supply | घरगुती एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर, दि. १३- जिल्ह्यातील गॅस वितरकांनी घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा अखंडित व सुरळीत ठेवावा. वितरणात विलंब, अनियमितता किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तर प्रामाणिक काम करणाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पारदर्शक व नियमानुसार वितरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व एलपीजी गॅस वितरकांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते.
बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी, बीपीसीएल कंपनीचे राजकुमार मिश्रा तसेच जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सींचे वितरक उपस्थित होते.
*गॅस बुकिंग मर्यादा व ओटीपी प्रणाली लागू -* केंद्र शासनाच्या धोरणानुसार शहरी भागातील नागरिकांसाठी गॅस बुकिंगची मर्यादा २५ दिवस तर ग्रामीण भागासाठी ४५ दिवस निश्चित करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरचे वितरण ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठविलेल्या ओटीपीची पडताळणी झाल्यानंतरच करण्यात येणार असून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांनी आपली ई-केवायसी तत्काळ पूर्ण करून अधिकृत पद्धतीनेच गॅस घ्यावा तसेच अनावश्यक साठेबाजी करू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी नागरिकांना केले.
गॅस गोदामांची विशेष तपासणी करा
एलपीजी गॅसचा साठा, वितरण व्यवस्था व सुरक्षेची खात्री करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गॅस गोदामांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यासाठी तालुकानिहाय विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. पथकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गॅस गोदामांना प्रत्यक्ष भेट देऊन साठा नोंदी, सुरक्षितता उपाययोजना, वितरण प्रणाली तसेच नियमांचे पालन यांची सखोल पडताळणी करावी व अनियमितता आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा, अनावश्यक साठेबाजी करू नये
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यात सध्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी करू नये. वितरकांनी बुकिंगच्या क्रमाने वेळेत गॅस वितरण करावे व ग्रामीण तसेच दुर्गम भागातही पुरवठा नियमित राहील याची विशेष काळजी घ्यावी. ग्राहकांना वेळेत सेवा मिळावी, वितरणात पारदर्शकता राखावी तसेच तक्रारींचे तत्काळ निवारण करावे, असेही त्यांनी सांगितले.
गैरवापर व काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई
घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होणार नाही यासाठी नियमित तपासणी करावी. अतिरिक्त दर आकारणी, बेकायदेशीर साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाकडून एलपीजी गॅस पुरवठा व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
बैठकीत गॅस सिलिंडरची उपलब्धता, साठा, बुकिंगनंतर वितरणाचा कालावधी, ग्रामीण व शहरी भागातील पुरवठा स्थिती तसेच वितरण व्यवस्थेतील अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
.webp)
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com