Top News

Trek In Nagar | महिलादिनानिमित्त ट्रेकॅम्पची अनोखी ‘ट्रेक इन सारी’ मोहीम यशस्वी

 गर्भगिरी डोंगराने अनुभवला माता-भगिनींचा उत्साह!

Trek In Nagar | महिलादिनानिमित्त ट्रेकॅम्पची अनोखी ‘ट्रेक इन सारी’ मोहीम यशस्वी


Trek In Nagar |  नगर : दर्शक । 

भल्या सकाळची वेळ... चाँदबिबी महालाजवळच्या गर्भगिरी डोंगराचा निसर्गरम्य परिसरात नटून-थटून आलेल्या सुमारे 600 महिलांच्या वाहनांची वर्दळ... त्यांचे जणू स्वागत करत असलेला सूर्यदेव... आणि नंतर विविधरंगी साड्या परिधाम केलेल्या महिलांच्या उत्साहाने निनादलेला परिसर... अशा भारावलेल्या वातावरणात गर्भगिरीच्या डोंगराने महिलांचा उत्साह अनुभवला. ट्रेकॅम्पने आयोजित केलेल्या ‘ट्रेक इन सारी’ या उपक्रमात महिला अक्षरशः मंत्रमुग्ध झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महिलादिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबविण्याची संकल्पना ट्रेकॅम्पच्या समन्वयक करिश्मा कोठारी-जोशी यांच्या पुढाकारातून प्रत्यक्षात उतरली. त्यास महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी आयएएफडी आणि सीआरडी ज्वेलर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नगर सायकलिंग क्लब यांनीही नेहमीप्रमाणे मदतीचा हात दिला.

सकाळी साडेपाच वाजता सर्व वयोगटातील सुमारे 600 महिला किल्ल्याजवळील मैदानात एकत्र आल्या. तेथून आपापल्या वाहनांनी सर्वजण चाँदबिबी महालालगतच्या गर्भगिरी डोंगरात पोहोचल्या. तेथे पोहोचल्यानंतर साडी परिधान केलेल्या महिलांनी डोंगरातील खडकाळ रस्त्यावरून सुमारे 2 किलोमीटर अंतर जिद्दीने पूर्ण करत गर्भगिरी महादेवाचे दर्शन घेतले. नटून-थटून आल्या असल्याने त्यांना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

नंतर विविध खेळ, स्पर्धा यात सहभागी झालेल्या महिलांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. ‘आयएफडीआय’च्या विद्यार्थ्यांबरोबरच इतर महिलांनी सादर केलेल्या रॅम्प वॉकला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. नृत्याचाही आनंद त्यांनी घेतला. अल्पोपहारानंतर सर्व महिलांना महिला उद्योजकांच्या सहकार्यातून भेटवस्तूही देण्यात आल्या. साडी परिधान करून डोंगरात फेरफटका मारण्याचा अनुभव बहुसंख्य महिलांना प्रथमच अनुभवला. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर हसतमुखाने सर्व महिला घरी पोहोचल्या. ट्रेकॅम्पच्या संस्थापिका मेघा व विशाल लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेकॅम्पच्या स्वयंसेवकांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.


--

साडी ही भारतीय स्त्रीची केवळ मानसिक आणि सामाजिक ओळख नाही, तर तिच्या सहनशक्तीचं प्रतीक आहे. गर्भगिरीच्या अवघड आणि अनवट पायावाटांवर साडी सावरत चालताना ट्रेकमध्ये सहभागी प्रत्येक महिलेला स्वतःमध्ये वेगळ्याच शक्तीची जाणीव जाणवली. साडीमध्ये डोंगर-दर्‍यात वावरताना वेगळीच जिद्द व ऊर्जा त्यांच्याच संचारली होती. दैनंदिन कामातून वेगळं काहीतरी केल्याचा अनुभव त्यांच्या समाधानी हास्यातून प्रकट होत होता. 

- मेघा लाहोटी, संस्थापिका, ट्रेकॅम्प

---

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने