Top News

Satkar | रामदास फुले यांचे कार्य कौतुकास्पद - उपमहापौर धनंजय जाधव

 Satkar |  नेप्तीचे रामदास फुले यांचा उपमहापौर धनंजय जाधव हस्ते सन्मान करून सत्कार

Satkar | रामदास फुले यांचे कार्य कौतुकास्पद - उपमहापौर धनंजय जाधव



                         



 Satkar | नगर : दर्शक ।: - नगर तालुक्यातील नेप्ती येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांची सकल माळी समाज ट्रस्ट, अहिल्यानगर यांच्या वतीने समाजाचे संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने नेप्ती विभागाच्या अध्यक्षपदी  नियुक्ती करण्यात आली.
         





नगर येथील  सकल माळी समाज ट्रस्टच्या  बैठकीत त्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.त्यांच्या सामाजिक कार्याचा विचार करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याने महापालिकेच्या वतीने उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते रामदास फुले यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.





         यावेळी बोलताना उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की, समाजाच्या प्रगतीसाठी संघटित शक्ती अत्यंत महत्त्वाची असते. समाजातील कार्यकर्ते एकत्र आले आणि संघटनात्मक पातळीवर काम केले तर समाजातील अनेक प्रश्न सोडविणे सोपे होते. सकल माळी समाज ट्रस्टने समाजाला एकत्र आणण्याचे आणि समाजातील कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्याचे जे कार्य हाती घेतले आहे, ते निश्चितच कौतुकास्पद असून समाजाच्या प्रगतीसाठी ते मोलाचे ठरेल.





           जाधव पुढे म्हणाले की, समाजातील तरुणांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतला पाहिजे.रामदास फुले यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना जबाबदारी मिळाल्याने समाजकार्याला अधिक गती मिळेल.समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींसोबत समन्वय ठेवून काम केल्यास विकासाची नवी दिशा निर्माण होऊ शकते. आगामी काळातही समाजाच्या हितासाठी अशा संघटनात्मक उपक्रमांना महापालिकेचे सहकार्य राहील. रामदास फुले यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी राजकारणापेक्षा समाजकार्याला अधिक प्राधान्य दिले असे प्रतिपादन उपमहापौर धनंजय जाधव यांनी केले.





           यावेळी सकल माळी समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले की, समाजाचे संघटन  बळकट करण्यासाठी विभागीय स्तरावर समाजातील समाजकार्याची आवड असलेल्या  तरुणांना जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नांची गरज असून त्यासाठी ट्रस्ट सातत्याने कार्यरत राहणार आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन समाजहिताचे कार्य पुढे नेले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.






          सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त अध्यक्ष रामदास विठोबा फुले यांनी सांगितले की, समाजाने दिलेल्या या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण प्रामाणिकपणे काम करू. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून शिक्षण, सामाजिक एकजूट आणि समाजहिताच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.



        यावेळी सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, नेप्तीचे माजी सरपंच अंबादास पुंड,सचिव राजेंद्र पडोळे, विश्वस्त विनोद पुंड,कोर कमिटी सदस्य अमोल भांबरकर,अनिल इवळे,रमेश चिपाडे, रोहित पठारे,बबन शिंदे,नितीन शिंदे,अनिल लोंढे,गणेश विद्ये  आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



         उपस्थित मान्यवरांनी रामदास फुले यांचे अभिनंदन करून पुढील समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने