Top News

स्नेहालयचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर,पद्मश्री डॉ.बंग,बाळासाहेब थोरात, डॉ. पठारे उपस्थित राहणार

 स्नेहालयचे वार्षिक बा, बापू , विनोबा , आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर,पद्मश्री डॉ.बंग,बाळासाहेब थोरात, डॉ. पठारे उपस्थित राहणार









नगर, दिनांक 15 एप्रिल 2026.

स्नेहालय संस्थेचे वर्ष 2025 - 26 चे बा, बापू , विनोबा आणि आदर्श शिक्षक पुरस्कार आज  जाहीर करण्यात आले. येत्या रविवारी, 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन संस्थेने केले आहे. पद्मश्री डॉ. अभय बंग, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सीएसआरडी संस्थेचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 10 वाजता औद्योगिक वसाहतीमधील स्नेहालय पुनर्वसन संकुल येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे . सामाजिक क्षेत्रातील  कर्मयोग्यांशी संवादाची संधी यामुळे सर्वांना मिळते आहे.



 बा ( कस्तुरबा गांधी ) पुरस्कारासाठी हावडा ( बंगाल) येथील समरिटन हेल्प मिशन या संस्थेच्या सहसंस्थापिका श्रीमती शबाना मामुन अख्तर यांची निवड करण्यात आली. मागील 3 दशकात त्यांनी 50 आजारांवर बालकांना शिक्षण आणि महिलांना रोजगार कौशल्यासह सक्षम केले.



बापू  ( महात्मा गांधी )पुरस्कारासाठी तळ कोकणातील जीवन आनंद या संस्थेचे संस्थापक दांपत्य सौ.भक्ती आणि संदीप परब यांना निवडण्यात आले. मागील 20 वर्षात त्यांनी 10 हजारांवर मनोरुग्ण ,अनाथ आणि निराधार यांचे उपचार आणि पुनर्वसन केले. राष्ट्रसंत विनोबा पुरस्कार आर्वी ( जिल्हा बीड) येथील शांतीवन प्रकल्पाचे संस्थापक सौ कावेरी आणि दीपक नागरगोजे या दांपत्याला जाहीर करण्यात आला. अनाथ ,वंचित आणि विशेषतः ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय त्यांनी 25 वर्षांपासून केली. आर्वी परिसर जलसमृद्ध करून येथील विस्थापन कायमचे रोखले.



आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत वैश्विक दर्जाचे शिक्षण देणारे  दत्तात्रय वारे गुरुजी, नगरच्या झोपडपट्ट्यात शालाबाह्य  मुलांना शिक्षणाची गोडी लावणारे सचिन वैजनाथ वाघ आणि स्नेहालय इंग्रजी माध्यम शाळेत विशेष गरजयुक्त बालकांसाठी मातृभावनेतून शिकवणाऱ्या चंद्रकला कराळे यांची निवड करण्यात आली.


बा,बापु आणि विनोबा पुरस्कार प्रत्येकी 50,000/- तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रत्येकी 10 हजार रुपयांचे आहेत.  पुस्तके , सन्मानपत्र , स्मृतिचिन्ह इ. चाही यात समावेश असतो.



पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांच्या संस्थांशी आणि कार्याशी स्नेहालय आपले देणगीदार आणि संसाधने यानिमित्ताने जोडून देते. सेवा संवर्धन कार्यशाळेच्या माध्यमातून अशा संस्थांच्या सक्षमीकरणात आणि शाश्वतीकरणात   हातभार लावते .वर्ष 1995 पासून आजवर 600 हून अधिक सामाजिक संस्थांना आणि कार्यकर्त्यांना अशा पुरस्कारांद्वारे स्नेहालय  प्रोत्साहित करीत आले असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड यांनी सांगितले.

या पुरस्कारांसाठी पुणे येथील आदर्श शिक्षिका स्वर्गीय इंदिरा आणि माजी आमदार श्यामकांत मोरे तसेच शिक्रापूर येथील स्वर्गीय सीताबाई आणि रावसाहेब मांढरे यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक सहयोग दिला.

या संदर्भात अधिक माहितीसाठी 7770027505 येथे संपर्काचे आवाहन स्नेहालयाने केले आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने