पोलीस हवालदार राजू सुद्रिक यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सन्मान
नगर : दर्शक । 3 मे 2026।
नगर - राज्यातील पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' पुरस्कार अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस हवालदार राजू आप्पासाहेब सुद्रिक यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र दिनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांचा सन्मान केला.
महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सन २०२५ या वर्षासाठीचे सन्मानचिन्ह नुकतेच घोषित करण्यात आले. यामध्ये राज्यभरातील ८०० पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे. राजू सुद्रिक यांनी अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असताना गेल्या सतत १५ वर्षांपासून अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांचा उल्लेखनीय सेवा अभिलेख, उत्तम प्रशासकीय कार्यक्षमता आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्राद्वारे सुद्रिक यांचे कौतुक करताना म्हटले की, आपल्या या उत्तम कामगिरीबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यात आपण अशीच उल्लेखनीय कामगिरी पार पाडाल, अशी मला आशा आहे. सध्या राजू सुद्रिक हे एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com