मॉक ड्रिल की निष्काळजीपणा? प्रशिक्षणावेळी हँडग्रेनेडचा स्फोट; दोन पोलिसांच्या करंगळ्या तुटल्या






अचानक  हँडग्रेनेडचा स्फोट झाला 

मॉक ड्रिल हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू असताना हँडग्रेनेड हातात फुटल्याने चार कर्मचारी जखमी झाले. पोलीस मुख्यालयातच ही घटना घडली. पोलीस कर्मचारी हातात हँडग्रेनेड घेऊन माहिती देत होते. ही माहिती देत असतानाच अचानक  हँडग्रेनेडचा स्फोट झाला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. यात चारजण जखमी झाले. दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना ताबडतोब उपचारासाठी खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.चौघांचीही प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं जात आहे. पण दोघांची करंगळी तुटून पडली आहे.


पिन ओढली आणि जागेवर हातात ब्लास्ट झाला

आमचा मॉक ड्रिलचा डेमो सुरू होता. आमच्या हातात हँडग्रेनेड होते.ते कसे फोडायचे? काय करायचे? हे काहीच आम्हाला सांगितलं नव्हतं. ऑर्डर आल्यावर पिन ओढली आणि जागेवर हातात ब्लास्ट झाला. माझी करंगळी तुटली. डोळ्यात धूर गेला, असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.

 

        सूचना होत्या पण संपूर्ण सूचना दिल्या नव्हत्या

दुसऱ्या एका जखमी कर्मचाऱ्यानेही याची माहिती दिली. आमच्याकडे हँडग्रेनेड होते.  त्याची माहिती आम्हाला नव्हती. सूचना होत्या पण संपूर्ण सूचना दिल्या नव्हत्या. या स्फोटात माझी करंगळी तुटून पडली आहे, असे या जखमी पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.



नगर

येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान अत्यंत धक्कादायक दुर्घटना घडली आहे. मॉक ड्रिल दरम्यान हाताळणीचे प्रशिक्षण दिले जात असताना एका हँडग्रेनेडचा हातातच भीषण स्फोट झाला. 



या दुर्घटनेत चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
२५ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचाऱ्यांना हँडग्रेनेड कसा हाताळावा याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली जात होती.



त्याचवेळी अचानक हँडग्रेनेडचा हातातच स्फोट झाला.या दुर्दैवी घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांच्या करंगळ्या तुटल्या आहेत. तर इतर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.



घटनेनंतर पोलीस मुख्यालयात पळापळ आणि गोंधळ उडाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




 तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी सांगितले की, हा स्फोट स्मोक हँडग्रेनेड फुटल्यामुळे झाला आहे. जमाव पांगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या ग्रेनेडची पिन काढल्यानंतर संबंधित जवानांकडून लिव्हर सुटल्याने हा अपघाती स्फोट झाला.