न्यू आर्ट्स कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

“गुणवंत विद्यार्थी हे महाविद्यालयाचे भूषण” — अध्यक्ष रामचंद्रजी दरे









नगर : दर्शक । 

न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय, अहिल्यानगर या गौरवशाली परंपरा लाभलेल्या शैक्षणिक संस्थेने सन २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एच.एस.सी.) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



         यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामचंद्रजी दरे यांनी “गुणवंत विद्यार्थी हे महाविद्यालयाचे खरे भूषण असून त्यांच्या यशामुळे संस्थेची शैक्षणिक परंपरा अधिक समृद्ध होत असते,” असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि शिस्त यांच्या जोरावर यश संपादन केल्याचे सांगत त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.





         महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल तब्बल ९९.२८ टक्के लागला असून कु. कोठुळे प्रणाली बाबासाहेब हिने ८८.०० टक्के गुण मिळवत शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. कॉमर्स शाखेचा निकाल ९१.७० टक्के लागला असून कु. गायकवाड क्षितिजा अर्जुन हिने ९२.३३ टक्के गुणांसह महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. कला शाखेचा निकाल ९२.८९ टक्के लागला असून कु. सोनवणे तनुजा पांडुरंग हिने ८६.१७ टक्के गुण मिळवत शाखेत प्रथम क्रमांक संपादन केला.





         तसेच एच.एस.सी. व्होकेशनल विभागाचाही निकाल उल्लेखनीय ठरला असून विभागाचा एकूण निकाल ९७.३६ टक्के लागला आहे. फूड प्रॉडक्ट अँड टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थी चि. राम रमेश वाबळे याने ७९.३३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ९५.९६ टक्के लागल्याने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.





          यावेळी प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात नीट, जेईई, सीईटी, सीए तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन केले जाते. याशिवाय करिअर मार्गदर्शन मेळावे, पालक मेळावे, विविध व्याख्याने, फन फेअर यांसारखे उपक्रम नियमित आयोजित करण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांसाठी मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व ब्युटी पार्लर प्रशिक्षणही दिले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताविकासास मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.




        कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. सौ. कल्पना कानवडे (दारकुंडे) मॅडम यांनी केले. या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभास अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव मा. ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मा. मुकेश दादा मुळे, खजिनदार मा. ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.




          या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य प्रा. सौ. कल्पना कानवडे (दारकुंडे), पर्यवेक्षक प्रा. सुभाष गोरे, सर्व शाखांचे समन्वयक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना म्हस्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रा. सुभाष गोरे यांनी मानले.