नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने संघर्षातून मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल अरबाज सय्यद यांचा भव्य सत्कार करून सन्मान
नगर :
नगर तालुक्यातील नेप्ती येथील अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातील अरबाज जमीर सय्यद यांची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही मिळेल ते काम करत शिक्षण पूर्ण करून अरबाज यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे आई-वडिलांसह संपूर्ण नेप्ती गावाचा सन्मान वाढला असून ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करून गौरव करण्यात आला. पेढे वाटून फटाक्यांच्या आतषबाजीत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन वसंत पवार होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्राध्यापक एकनाथ होले सर यांच्या हस्ते अरबाज सय्यद यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला . कार्यक्रमास माजी उपसरपंच फारुक सय्यद, सरपंच संजय अशोक जपकर, माजी सरपंच संजय आसाराम जपकर, समता परिषदेचे नेते रामदास फुले, माजी उपसरपंच दादू चौगुले, जालिंदर शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवाजी होळकर, माजी चेअरमन वसंत पवार, पोलीस पाटील अरुण होले, ग्रामपंचायत सदस्य बंडू जपकर, अतुल जपकर, प्राध्यापक बाबूलाल सय्यद, जमीर सय्यद, जावेद सय्यद, मोबीन सय्यद, सोन्याबापू कानडे, बाळासाहेब जपकर , रफिक सय्यद नाले हैदर यंग पार्टी व दोस्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अरबाज सय्यद यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील सेवेस शुभेच्छा दिल्या.
आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील युवकांनी परिस्थितीला दोष न देता शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर पुढे जाण्याची गरज आहे. अरबाज सय्यद यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले आहे. हे यश केवळ त्यांच्या कुटुंबाचे नसून संपूर्ण नेप्ती गावासाठी अभिमानाची बाब आहे.” त्यांनी युवकांना मोबाईल आणि व्यसनांच्या आहारी न जाता ध्येय निश्चित करून सातत्याने परिश्रम घेण्याचे आवाहन केले. गरीबी अडथळा नसून जिद्द आणि शिक्षण हे खरे सामर्थ्य आहे. नेप्ती गावाचा अरबाजने सन्मान वाढवला असे प्रतिपादन प्राध्यापक एकनाथ होले सर यांनी केले.
पुढे प्रा. होले म्हणाले, “गरीबी ही कधीच यशाच्या आड येत नाही. आई-वडिलांचे कष्ट, घरातील संस्कार आणि स्वतःची जिद्द असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते. अरबाज यांनी मिळेल ते काम करून शिक्षण घेतले आणि आज पोलीस दलात निवड होऊन त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. अशा युवकांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून भविष्यात आणखी अनेक तरुण स्पर्धा परीक्षांकडे वळतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावातील युवकांनी अरबाज सय्यद यांच्या संघर्षातून प्रेरणा घ्यावी. आज अनेक तरुण परिस्थितीसमोर हार मानतात; मात्र अरबाज यांनी संकटांवर मात करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली तर ग्रामीण भागातून अनेक अधिकारी आणि कर्मचारी घडू शकतात. युवकांनी शिक्षण, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांच्या वतीने अरबाज सय्यद यांचा पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून नेप्ती गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला. ग्रामस्थांनी भविष्यातही गावातील गुणवंत युवकांचा अशाच पद्धतीने सन्मान करण्यात येईल, अशी भावना व्यक्त केली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com