खारे कर्जुने शिवारात बॉम्बचा स्फोट; एका जणाचा मृत्यू 

खारे कर्जुने शिवारात बॉम्बचा स्फोट ; एका जणाचा मृत्यू




नगर - नगर तालुक्यातील खारे कर्जुने शिवारात लष्कराच्या सरावावेळी न फुटलेल्या बॉम्बचा अचानक स्फोट होवून त्या परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १० जून रोजी दुपारी घडली. संजय दशरथ गायकवाड (वय ५२, रा. खारे कर्जुने, ता.नगर) असे मयताचे नाव आहे. मयत गायकवाड हे वीट भट्टीवर मजुरी काम करत होते, तर त्यांच्या कडे काही शेळ्या ही पाळलेल्या होत्या. वीट भट्टीवर काम नसल्यास ते इतर ठिकाणी मजुरी करायचे तर कधी शेळ्या चारायला घेवून जायचे. खारे कर्जुने गावच्या जवळच लष्कराचे के. के. रेंज हे युद्ध सराव क्षेत्र आहे. 




या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून युद्ध सराव सुरु होता. त्याबाबत लष्कराच्या वतीने ग्रामपंचायतला माहिती देण्यात आली होती. त्यामुळे ग्रामपंचायत ने ध्वनीक्षेपकावर ग्रामस्थांना के. के. रेंज परिसराकडे न जाण्याच्या सूचनाही दिलेल्या होत्या. मात्र तरीही मयत गायकवाड हे शेळ्या चारण्यासाठी त्या भागाकडे गेले, शेळ्या चारत असताना त्यांना लष्करी सरावावेळी न फुटलेला बॉम्ब दिसला. त्यांनी तो निकामी झालेला असावा असे समजून उचलला आणि दगडावर ते तो आदळू लागले. त्याच वेळी त्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला. 



त्यात गायकवाड हे जागीच ठार झाले. त्यावेळी तेथे असलेली १ शेळी ही दगावली तर १ शेळी जखमी झाली. स्फोटाच्या आवाजाने काही नागरिकांनी तेथे धाव घेत पोलिसांना व गायकवाड यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मयत गायकवाड यांच्या मृतदेहाचे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मत गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, सून, भाऊ असा परिवार आहे.