Crime News Nagar | मार्केटयार्ड परिसरात वृद्ध महिलेची फसवणूक करणारा जेरबंद
नगर - मार्केटयार्ड परिसरात हमाल पंचायत जवळ एका वृध्द महिलेची फसवणूक करून त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. ज्ञानदेव हरीभाऊ चेडे (रा. पारनेर, सध्या रा. सारसनगर, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे.
द्रौपदाबाई धोंडीराम घोलप (वय ७०, रा. भातोडी पारगाव, ता. नगर) यांना ५ जून रोजी मार्केट यार्ड परिसरात रिक्षाची वाट पाहत उभ्या असताना आरोपीने त्यांच्याजवळ जात गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. तुमचे डोलाचे पैसे आले आहेत तसेच तुमच्या मुलाने तुम्हाला बोलावले आहे, असे सांगत त्याने दुचाकीवर बसवून हमाल पंचायत कार्यालयासमोर नेले. तेथे तुम्हाला पैसे मिळवून देण्यासाठी गळ्यातील पानपोत आणि कानातील सोन्याची फुले द्यावी लागतील, असे सांगून आरोपीने महिलेकडील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि तेथून पसार झाला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व त्यांच्या पथकाने मार्केट यार्ड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान संशयित ज्ञानदेव हरीभाऊ चेडे (रा. पारनेर, सध्या रा. सारसनगर, अहिल्यानगर) याची ओळख पटली. पोलिसांनी त्याला गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून फसवणुकीने घेऊन गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अंमलदार विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके, बाळकृष्ण दौंड, राहुल शिंदे, साबीर शेख, विशाल दळवी, विनोद बोरगे, दीपक रोहकले, सत्यम शिंदे, सुरज कदम, शिरीष तरटे, अतुल कोतकर, रमेश शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, अतुल लाटे, सचिन लोळगे, संकेत धिवर, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू, महिला पो.हे.कॉ. रोहिणी दरंदले, महिला पो. कॉ. पल्लवी रोहकले यांच्या पथकाने केली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com