वीस वर्षांची हरित परंपरा जपत ॲड. अनुराधा येवले यांचा वटसावित्री पौर्णिमेनिमित्त सात वडांची लागवड
नगर : दर्शक ।
वटसावित्री पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गेली सलग वीस वर्षे सातत्याने सात वडांची झाडे लावण्याचा अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या ॲड. अनुराधा येवले यांनी यंदाही हरित परंपरा जपत वृक्षलागवड केली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेशजी सु. पैठणकर साहेब,
अहिल्यानगर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.कृष्णा झावरे, ॲड. अनुराधा येवले, ॲड. स्वाती पाटील, ॲड. स्वाती नगरकर, ॲड. पल्लवी होनराव, ॲड. रुपाली पठारे, ॲड. शिल्पा बेरड, ॲड. सुरेश भोर, ॲड.रणजित गोरे, ॲड. सचिनदेवा पाठक, रविंद्र घोडके (अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) इंद्रजित जाधोर, विकास कर्डीले, अनिल निमसे, आतिष मिरपगार, बाळु कटारनवरे उपस्थित होते.
या प्रसंगी न्यायाधीश योगेश जी. पैठणकर म्हणाले की, भारतीय संस्कृतीतील वटसावित्री हा सण केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून तो निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करणारा उत्सव आहे. अशा सणांचे सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्व ओळखून प्रत्यक्ष वृक्षलागवडीच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा देणे ही काळाची गरज आहे. ॲड. अनुराधा येवले यांनी गेली वीस वर्षे अखंडपणे हा उपक्रम सुरू ठेवला आहे, ही बाब अत्यंत कौतुकास्पद असून त्यातून समाजात पर्यावरण संरक्षणाची सकारात्मक जाणीव निर्माण होत आहे.
अहिल्यानगर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, वकील हा केवळ न्यायालयापुरता मर्यादित नसून समाजप्रबोधनाची भूमिकाही प्रभावीपणे पार पाडत असतो. पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने काम करणाऱ्या ॲड. अनुराधा येवले यांनी वीस वर्षांची अखंड परंपरा निर्माण करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते आणि पुढील पिढ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक संस्कार घडतात, असे त्यांनी नमूद केले.
ॲड. स्वाती पाटील म्हणाले की, वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि घटणारे हरित क्षेत्र या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. एका झाडाची लागवड म्हणजे भविष्यातील अनेक पिढ्यांना शुद्ध हवा, सावली आणि पर्यावरणाचे संरक्षण देण्याचे कार्य होय.
ॲड. स्वाती नगरकर म्हणाले की, न्यायव्यवस्थेप्रमाणेच समाजाप्रती असलेली आपली नैतिक जबाबदारीही प्रत्येकाने अशा विधायक उपक्रमांतून पार पाडली पाहिजे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन करून अशा उपक्रमांची व्याप्ती अधिक वाढावी, अशी भावना व्यक्त केली.
उपक्रमाच्या प्रमुख प्रेरक ॲड. अनुराधा येवले यांनी सांगितले की, वटसावित्री पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व जपत त्याला पर्यावरण संरक्षणाची जोड देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला. गेली वीस वर्षे दरवर्षी सात वडांची झाडे लावण्याचा संकल्प अखंड सुरू असून या वृक्षांचे संवर्धन करण्यालाही तितकेच महत्त्व दिले जाते. समाजातील प्रत्येक कुटुंबाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला, तर पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात उपस्थितांनी वृक्षसंवर्धन ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती सातत्याने जोपासण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. वटवृक्षासारख्या दीर्घायुषी वृक्षांची लागवड करून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. गेली दोन दशके सातत्याने सुरू असलेल्या या हरित परंपरेमुळे ॲड. अनुराधा येवले यांचा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला नवी दिशा देणारा ठरत आहे. सर्वांनी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com