संजय गांधी निराधार समितीची बैठक आता दरमहा; दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एसएमएस सुविधा सुरू होणार - तहसीलदार मिलिंद कुलथे 

संजय गांधी निराधार समितीची बैठक आता दरमहा; दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एसएमएस सुविधा सुरू होणार - तहसीलदार मिलिंद कुलथे


दिव्यांग, विधवा व निराधारांची प्रकरणे तातडीने निकाली काढणार

नगर : दर्शक । 

नगर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक यापुढे तीन महिन्यांऐवजी दर महिन्याला घेण्यात येईल. दिव्यांग, विधवा, निराधार तसेच परित्यक्ता माता-भगिनींची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढली जातील. याशिवाय पुढील महिन्यापासून लाभार्थ्यांना त्यांच्या प्रकरणाची माहिती एसएमएसद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नगरचे तहसीलदार मा. श्री. मिलिंद कुलथे यांनी दिली.



       नुकतेच नगर तालुक्याचे तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर नगर तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष मा. श्री. राजू दारकुंडे, भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. वसंत शिंदे, समिती सदस्य मा. श्री. बाबासाहेब धिवर, जेऊर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मा. श्री. बाबासाहेब तोडमल तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. बाबासाहेब दरेकर आदींनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार 
केला. यावेळी समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.




         निवेदनात संजय गांधी निराधार अनुदान समितीची बैठक सध्या तीन महिन्यांतून एकदा होत असल्याने अनेक लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित राहत असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे बैठक दर महिन्याला घेण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. 



तसेच संजय गांधी निराधार शाखेचे नायब तहसीलदार मा. श्री. भनवसे यांची वारंवार इतरत्र नियुक्ती होत असल्यामुळे शाखेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून लाभार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. शाखेतील कर्मचाऱ्यांची इतरत्र नियुक्ती न करता त्यांच्याकडून केवळ शाखेचेच काम करून घ्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला.



      यावर तहसीलदार मा. श्री. मिलिंद कुलथे यांनी समितीच्या सर्व मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेत आवश्यक त्या सूचना तत्काळ अमलात आणण्याचे आश्वासन दिले. संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक यापुढे प्रत्येक महिन्याला घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दिव्यांगांची जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. तसेच पुढील महिन्यापासून एसएमएस सुविधा सुरू करण्यात येणार असून लाभार्थ्यांना त्यांच्या प्रकरणाची माहिती वेळेवर मिळेल, असेही त्यांनी सांगितले.




      मंजूर झालेल्या प्रकरणांच्या खातेपुस्तिका लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास होणारा विलंब कमी करण्यासाठी आवश्यक बदल करण्यात येतील. मंजुरीनंतर पुढील महिन्यातच लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पेन्शन जमा होण्यासाठी आवश्यक नियमावली तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.




      दिव्यांग, विधवा, निराधार तसेच परित्यक्ता माता-भगिनी यांच्या प्रकरणांचा बारकाईने आढावा घेऊन ती तातडीने मंजूर करण्यासाठी आवश्यक निकषांमध्ये बदल करण्यात येतील. काही अडचणी अथवा सूचना असल्यास त्या लेखी किंवा तोंडी स्वरूपात मांडाव्यात, त्यावर प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही केली जाईल. तसेच दिव्यांगांच्या आधारसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठीही प्रशासन प्रयत्नशील राहील, असे तहसीलदारांनी सांगितले.



       तहसीलदार मा. श्री. मिलिंद कुलथे यांनी अतिशय सकारात्मक व विधायक चर्चा घडवून आणल्याबद्दल उपस्थित शिष्टमंडळाने त्यांचे आभार मानले.