बोल्हेगाव परिसरामध्ये धडक कारवाई पोलिसांनी दारू अड्डा केला पूर्णपणे उद्धवस्त
नगर : दर्शक । दि १ जुलै २०२६ ।
बोल्हेगाव परिसरामध्ये चालू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर तोफखाना पोलिसांच्या पथकाने अचानकपणे छापेमारी केली. या धडक कारवाईत पोलिसांनी दारू अड्डा पूर्णपणे उद्धवस्त करत एकाला ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तोफखाना पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, पोलीस कर्मचारी दिनेश मोरे आणि हेमंत झिने हे कर्तव्यावर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. बोल्हेगाव येथील गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाभळीच्या झाडाच्या आडोशाला एक इसम बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
या माहितीची गांभीर्याने दखल घेत, पोलीस पथकाने छापा टाकून राम भाऊ खलाटे (वय ४२, रा. मोरया पार्क, बोल्हेगाव, अहिल्यानगर) याला पकडले.
त्याच्याकडे दोन ड्रममध्ये भरलेली एकूण ५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू आढळून आली. या जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ५ हजार रुपये आहे. याबाबत महिला पो. हे. कॉ. प्रमिला गायकवाड यांच्या तक्रारीवरून आरोपी राम भाऊ खलाटे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com