आंतरराष्ट्रीय टॅलेंट ऑलिम्पियाड (राऊंड-2) च्या विविध विषयातील परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूल नगरच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
नगर : दर्शक । दि १ जुलै २०२६ ।
आंतरराष्ट्रीय स्तरावरील आंतरराष्ट्रीय टॅलेंट ऑलिम्पियाड (राऊंड-2) च्या विविध विषयांच्या परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूल, अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विविध देशांतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून झालेल्या या स्पर्धात्मक परीक्षेत पोदारच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक क्षमता, तार्किक विचारशक्ती आणि विषयांवरील प्रभुत्व सिद्ध करत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कौशल्यांना चालना देणे, त्यांच्यातील विश्लेषण क्षमता, तर्कशक्ती आणि विषयांचे सखोल ज्ञान विकसित करणे हा आंतरराष्ट्रीय टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेचा प्रमुख उद्देश आहे. या परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, गणित, हिंदी आणि विज्ञान या विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत उच्च गुणवत्ता प्राप्त केली.
इयत्ता पहिलीतील नितीन निरज मेश्राम याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत रु. 2,000 ची शिष्यवृत्ती प्राप्त केली. इयत्ता तिसरीतील वेदिका विकास कोरडे हिने राज्यात तृतीय क्रमांक मिळवत रु. 1,200 ची शिष्यवृत्ती पटकावली. तसेच इयत्ता तिसरीतील साईशा अमोल बागुल हिने राज्यात पाचवा क्रमांक मिळवत रु. 1,000 ची शिष्यवृत्ती मिळवली.
याशिवाय, इयत्ता पहिलीतील सानवी जामोदकर आणि आराध्या तापरे यांनी झोनल स्तरावर स्थान मिळवत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) आणि रु. 1,000 चे गिफ्ट व्हाउचर प्राप्त केले. इयत्ता पहिलीतील अद्विक अदे तसेच इयत्ता तिसरीतील तनिष्का रेडगावकर यांनी प्रत्येकी रु. 500 चे गिफ्ट व्हाउचर मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
याचबरोबर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उच्च गुणवत्ता प्राप्त करत पदके मिळवली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारीतही आपले स्थान निश्चित केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचे मोलाचे सहकार्य आणि शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप, उपप्राचार्य शगुफ्ता काझी, सीनियर अॅडमिन ऑफिसर आशुतोष नामदेव, अॅडमिन ऑफिसर नितीन गवांदे तसेच सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही अशाच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या यशातून इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. पोदार इंटरनॅशनल स्कूलने दर्जेदार शिक्षणाबरोबरच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या आपल्या परंपरेला या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com