शिक्षणासोबत संस्कारही तितकेच महत्त्वाचे ; विद्यार्थ्यांनी पालक व देशाचे नाव उज्ज्वल करावे – महापौर ज्योती गाडे
पद्मशाली स्नेहिता संगमतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही गौरव
नगर : दर्शक । दि १ जुलै २०२६ ।
विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिक्षणासोबत संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव जोपासली पाहिजे. शाळा व महाविद्यालयात नियमित उपस्थित राहून शिक्षण घेतल्यास पालकांवरील आर्थिक भारही कमी होतो. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने पालकांसह देशाचेही नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन नगरच्या महापौर सौ. ज्योती गाडे यांनी केले.
पद्मशाली स्नेहिता संगमच्या वतीने आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. गेल्या सलग २६ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमामुळे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर बँकेचे संचालक दत्तात्रय रासकोंडा होते. यावेळी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, भाजप गटनेते नगरसेविका शारदाताई ढवण, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या सौ. शितल अजय ढोणे तसेच सक्सेस सायन्स अकॅडमीचे संचालक प्रा. इंजी. सुजित वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी आजच्या बदलत्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व विशद केले. काळानुरूप ज्ञान संपादन करून स्वतःला सक्षम व स्पर्धात्मक बनविण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
भाजप गटनेते नगरसेविका शारदाताई ढवण यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे सांगितले. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो. स्वातंत्र्याच्या मर्यादा ओळखून जबाबदारीने वागावे आणि आई-वडिलांचे नाव मोठे करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या सौ. शितल ढोणे यांनी पद्मशाली स्नेहिता संगमच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळविण्यावर भर न देता समाजकार्य, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही तितकेच महत्त्व द्यावे. चांगले नागरिक घडविण्यात अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते प्रा. इंजी. सुजित वाघ यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला. आत्मविश्वास हीच यशाची खरी गुरुकिल्ली असून गरिबी कधीही शिक्षणातील अडथळा ठरत नाही. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आपल्या संस्थेत प्रवेश घेताना फीमध्ये २५ टक्के सवलत जाहीर केली.
प्रास्ताविक पद्मशाली स्नेहिता संगमच्या अध्यक्षा डॉ. रत्नाताई बल्लाळ यांनी केले. त्यांनी संस्थेच्या २६ वर्षांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. उपाध्यक्षा रेखा वड्डेपल्ली व सचिव सपना छिंदम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सरोजनी रच्चा यांनी तर आभार प्रदर्शन सविता कोटा यांनी केले.
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही विशेष गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून पाच सुवर्णपदके पटकावणारे श्री. देवदत्त गुंडू यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या आदित्य संजय खरदास यांचाही गौरव करण्यात आला. जर्मन भाषा शिक्षिका म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पद्मा पुलगम तसेच मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या दिव्या बोज्जा यांचा सन्मान करण्यात आला. सी. व्ही. रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत राज्यात तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या श्लोक दोमल याचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात दहावी व बारावीतील एकूण ६० गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमासाठी प्रमोद गुंडू (मोबाईल शॉप), गुंडू क्रिएशन, गुंडू अम्मा साडी, हॉबी टेलर, सविता येनगंदुल, आनंद येमुल, सीए सुनंदा रच्चा, रेणुका खरदास, क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा तसेच प्रमिला चिलका यांनी आर्थिक सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खजिनदार नीता बुरा, सविता एक्कलदेवी, विजया गुंडू, साधना कोल्पेक, लक्ष्मी गुंडू, सोनी लयचेट्टी, रोहिणी पागा, पुनम वन्नम, सविता येनगंदुल यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि महिला मंडळाच्या सदस्यांसाठी रासकोंडा परिवाराच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com