बोल फाऊंडेशनतर्फे भिंगारमधील विद्यार्थ्यांना शालेय संचांचे वाटप
नगर : दर्शक ।
"प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहावीत. त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचारांची जोड दिल्यास जीवनात यश निश्चित मिळते," असा प्रेरणादायी संदेश श्रीजी ग्रुपचे संचालक सुदीप अगरवाल यांनी दिला.
सलाबादप्रमाणे ब्रेड ऑफ लाईफ (बोल) फाऊंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी भिंगार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी परिषद शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय संचांचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे सुदीप अगरवाल व सौ. स्मिता अगरवाल यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर व विद्यार्थिनींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी बोल फाऊंडेशनच्या सल्लागार उषा मेनन यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांचे शाळेत आगमन होताच विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत बोल फाऊंडेशनने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, समाजसेवा आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
मार्गदर्शन करताना सुदीप अगरवाल म्हणाले, "मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांचीच मोठी यशोगाथा घडते. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी चिकाटी, मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा संकल्प करावा.
ब्रेड ऑफ लाईफ (बोल) फाऊंडेशनचे संस्थापक गौरव पाटोळे यांनी संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत समाजातील वंचित, निराधार, दुर्बल आणि गरजू घटकांना प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार मदतीचा हात दिला पाहिजे, हीच खरी समाजसेवा असल्याचे प्रतिपादन केले.
संस्थेच्या सचिव शोभा पाटोळे यांनी बोलताना, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांचे भविष्य घडविण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष जोसेफ पाटोळे यांनी प्रमुख पाहुणे सुदीप अगरवाल यांचा शाल, रोपटे व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच सौ. स्मिता अगरवाल व उषा मेनन यांचाही शोभा पाटोळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक सुभाष भारूड यांनी केले. विद्यार्थी प्रसाद शेलार याने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. शेवटी जोसेफ पाटोळे यांनी शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी, मान्यवर आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
या उपक्रमामुळे शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा लाभ झाला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आत्मविश्वास आणि नवीन उमेद निर्माण करणारा हा उपक्रम ठरला असून, बोल फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com