नाशिक महानगरपालिकेच्या धर्तीवर जलतरण तलाव विकसित करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

Collector Nagar | नाशिक महानगरपालिकेच्या धर्तीवर जलतरण तलाव विकसित करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया


नगर : दर्शक ।  जलतरण तलावाचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता, त्यातून दर्जेदार जलतरणपटू घडविणे आवश्यक आहे. यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या धर्तीवर जलतरण तलाव विकसित करावा. तसेच जलतरण तलावाचे संचालन बाह्य यंत्रणेकडे सोपवून खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.




जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी संगीता जगताप, तालुका क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, प्रा. श्रीकांत निंबाळकर, सुनील जाधव तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.




राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात यावा. अशा खेळाडूंना क्रीडा पोशाखांचे वितरण करण्यात यावे. तसेच त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करावे, असे डॉ. आशिया यांनी सांगितले. त्यामुळे खेळाडूंचे मनोबल उंचावण्यास मदत होईल आणि त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.




मागील काही वर्षांपासून खेळाडूंना क्रीडा प्रमाणपत्रे वितरित करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. ही प्रमाणपत्रे खेळाडूंना सुलभपणे उपलब्ध व्हावीत, यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करावे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून खेळाडूंना त्यांची क्रीडा प्रमाणपत्रे उपलब्ध होतील. तसेच खेळाडूंची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक माहिती साठवणूक प्रणाली उपलब्ध करावी, असे त्यांनी सांगितले.



तालुका स्तरावरील क्रीडा संकुलांच्या प्रश्नांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. शेवगाव व पाथर्डी येथे क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध नसल्याची, तर राहुरी येथे जागा उपलब्ध असूनही काही अडचणी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या ठिकाणांवरील प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढून क्रीडा संकुलांची कामे मार्गी लावावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.




क्रीडा संकुलांच्या विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेणे तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा संबंधित कार्यान्वयन यंत्रणेमार्फत ही कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.