Sispe Scam |  सीबीआय, इंटरपोल, गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या समन्वयातून यशस्वी प्रत्यार्पण





नगर

जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असलेल्या बहुचर्चित सिस्पे इनफिनाईट बिकन व तत्सम कंपन्यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल शामराव काळोखे याचे फिजी येथून भारतात यशस्वीरीत्या प्रत्यार्पण करण्यात आले असून, ३० जुलै रोजी त्याला भारतात आणण्यात आले. मुंबई विमानतळावर अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.


या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी श्रीगोंदा, सुपा आणि तोफखाना पोलीस ठाण्यांत सिस्पे, इनफिनाईट बिकन व तत्सम कंपन्यांविरोधात एकूण चार गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास सध्या आर्थिक

अधीक्षक मुम्मका सुदर्शन, पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे तपास करीत आहेत.


तपासादरम्यान संशयित आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी करण्यात आली असून, विविध मालमत्तांचा तपशील संकलित करण्यात आला आहे.त्यानुसार सुमारे ११४ कोटी ९३ लाख रूपयांच्या मालमत्तेच्या जप्तीच्या एमपीआयडी (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियम) प्रस्तावाला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. याशिवाय आणखी मालमत्तांचा समावेश असलेला पुरवणी प्रस्ताव तयार करण्याचे कामही सुरू आहे. 


याचबरोबर फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविण्याचे कामही युध्दपातळीवर सुरू आहे. शासनाकडून एमपीआयडी प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेत जबाब नोंदविण्यासाठी गुंतवणूकदारांची मोठी गर्दी होत आहे. या प्रकरणात यापूर्वी अनेक संचालक आणि एजंट यांना अटक करण्यात आली आहे.


मात्र, काही प्रमुख संशयित आरोपी देशाबाहेर पसार झाले होते. त्यांच्या विरोधात इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली असून, त्यांना भारतात परत आणण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने सीबीआय, परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि इंटरपोल यांच्या समन्वयातून विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना आता पहिले मोठे यश मिळाले असून, रेड कॉर्नर नोटीसवरील आरोपी राहुल काळोखे याला फिजीमध्ये शोधून तेथील स्थानिक अधिकायूँनी ताब्यात घेतले.




 त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याचे भारतात प्रत्यर्पण करण्या आले. गुरूवारी त्याला भारतात आणण्यात आले असून, आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावर त्याचा ताबा घेतला. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपींना भारतात आणण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार निलेश लंके यांनीही गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र व राज्यातील विविध तपास यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे.