Abacus Nagar | राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत आनंद विद्यालयाची दमदार कामगिरी; पार्थ खेडकर 'चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन' 

Abacus Nagar | नगर : दर्शक ।  एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने कल्याण रोड येथील द्वारका लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ५१ व्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत आनंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी





 Abacus Nagar | नगर : दर्शक ।  एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने कल्याण रोड येथील द्वारका लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ५१ व्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत आनंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. देशभरातील सुमारे २,५०० विद्यार्थ्यांच्या सहभागात पार पडलेल्या या पाच मिनिटांच्या स्पर्धेत आनंद विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ भरत खेडकर याने तब्बल २३० गणिते अचूक सोडवत 'चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन' हा सर्वोच्च किताब पटकाविला. त्याला आकर्षक ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि रोख तीन हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे, स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात अचूक गणिते सोडविण्याचा विक्रम नोंदविला गेला आहे.




         याच स्पर्धेत अथर्व कैलास बाबर याने १७१ अचूक गणिते सोडवून 'चॅम्पियन' होण्याचा मान मिळविला. तसेच शिवराज सचिन फाळके (१०३), विनिता महेश चिपोळे (९४), वेदांगी अभिजित भणगे (८१), रजत मयूर सुपेकर (७८), शिवांश गणेश शिंदे (७७), भूमिका भारत भवरे (७७), असद अन्सार पठाण (७२), सेजल रोहन बायस (६८),



 तनिष्का विनोद क्षीरसागर (५५), पवन सहदेव जांगिड (५२), विराज सनी जाधव (४६) आणि आयुष गोपाळ शिंदे (२६) यांनीही उल्लेखनीय कामगिरी करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आनंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव किसन तरटे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शारदा पोखरकर आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रवींद्र अष्टेकर यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.





         यावेळी शिक्षक प्रतिनिधी स्वाती ननावरे यांनी विद्यार्थ्यांनी अबॅकस प्रशिक्षणाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या यशामागे अबॅकस शिक्षिका नम्रता गांधी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.