Bhagyoday School Nagar | "भूगोल ही जगाची खिडकी ; वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज" – प्राचार्य ज्ञानदेव बेरड
नगर : दर्शक । विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होऊन खगोलशास्त्राबाबत जिज्ञासा वाढावी, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भाग्यश्री रोलिंग मिलच्या सहकार्याने इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत खगोलीय प्रदर्शन व कृत्रिम तारांगण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विश्वाची अद्भुत सफर अनुभवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड, रेणुका माता विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे, ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब कोतकर, गोविंद कदम, भूगोल विभागाचे प्राध्यापक एकनाथ होले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले, "भूगोल ही जगाची खिडकी आहे. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. या तारांगणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चंद्र, ग्रह, तारे, आकाशगंगा तसेच चांद्रयान-३ मोहिमेची माहिती प्रभावीपणे पाहता व समजता येत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, सृजनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. भविष्यात विज्ञान व अवकाश संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणाही त्यांना मिळते."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एकनाथ होले यांनी केले. त्यांनी कृत्रिम तारांगणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विश्व, ग्रह-तारे, सूर्य, चंद्र, आकाशगंगा तसेच चांद्रयान-३ मोहिमेची माहिती दृकश्राव्य पद्धतीने अनुभवता आली. अशा उपक्रमांमुळे विज्ञानातील नवनवीन संशोधनांची ओळख होऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा अधिक व्यापक होतात. प्रत्येक विद्यार्थ्याने जिज्ञासू वृत्ती जोपासून विज्ञानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरख कांडेकर, दत्तात्रय पांडुळे, सोपान तोडमल, धनंजय बारगळ, संतोष काकडे, शिवाजी धस, आदिनाथ ठुबे, गणेश गायकवाड, बाळासाहेब कावरे, सुधाकर गायकवाड तसेच विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com