तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांचे वेतन थांबवू नये; ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करा : सुनील गाडगे
नगर : दर्शक : शालार्थ वेतन प्रणालीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी राज्याच्या शिक्षण संचालनालयाने २० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिक्षकांना ई-केवायसी पूर्ण करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, सर्व्हरची समस्या, माहिती अपडेट न होणे तसेच आधार व इतर कागदपत्रांशी संबंधित अडथळे लक्षात घेऊन शिक्षक भारतीने केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे.
त्यामुळे राज्यातील शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारती चे राज्यसचिव सुनील गाडगे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित, अनुदानित तसेच जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, क्षेत्रीय स्तरावर कामाचा आढावा घेतल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता असल्याने ही मुदत वाढविण्यात आली आहे.
२० सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२६ चे वेतन नोव्हेंबर २०२६ मध्ये आहरित करण्यात येणार नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
शिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकांच्या अधिकाऱ्यांना संबंधित शाळांना तातडीने सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसीची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शालार्थ प्रणालीच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
शालार्थ ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांकडे करण्यात आली होती. शिक्षक भारतीचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर शिक्षण संचालनालयाने २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने शिक्षक भारतीच्या प्रयत्नांना यश आले आहे.
शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे म्हणाले, “शिक्षकांची कोणतीही चूक नसताना केवळ तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे वेतन थांबणे अन्यायकारक आहे. ई-केवायसीसाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय हा शिक्षकांच्या अडचणी लक्षात घेऊन घेतलेला सकारात्मक निर्णय आहे. मात्र, या कालावधीत शालार्थ प्रणाली सुरळीत राहणे आणि शिक्षकांना ई-केवायसी पूर्ण करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, याची शिक्षण विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे.”
गाडगे पुढे म्हणाले, “शिक्षकांना अध्यापनाच्या कामासोबत विविध ऑनलाइन प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ई-केवायसीच्या नावाखाली कोणत्याही शिक्षकाचे वेतन रोखले जाऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेने योग्य नियोजन करावे. शिक्षक भारतीने शिक्षकांच्या या प्रश्नासाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले हे यश आहे. आता २० सप्टेंबरपूर्वी सर्व शिक्षकांचे ई-केवायसी पूर्ण होण्यासाठी शालार्थ प्रणाली सक्षम करावी आणि शिक्षकांना आवश्यक तांत्रिक मदत उपलब्ध करून द्यावी.”
या मागणीसाठी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटी चे उपाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जिल्हा सचिव विजय कराळे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पवार, पुणे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, कार्यवाह संजय भुसारी यांच्यासह कैलास जाधव, योगेश हराळे, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे,
संभाजी पवार, हनुमंत रायकर, सिकंदर शेख, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, विभावरी रोकडे, मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे, सोनाली अकोलकर तसेच विनाअनुदानित राज्याध्यक्ष रूपाली कुरूमकर आदींनी या मागणीसाठी पाठपुरावा केला.
दरम्यान, ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली असल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निर्धारित कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com