स्मार्ट मीटरबाबत प्रथम गैरसमज दूर करा; त्यानंतरच मीटर बसवा
ग्राहकांना विश्वासात घेऊन स्मार्ट मीटर बसविण्याची सामाजिक कार्यकर्त्या स्वाती सिरसुल यांची मागणी
नगर : दर्शक । महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत वीज ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आणि संभ्रम निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी आंदोलने व रास्ता रोको करण्यात येत आहेत. अहिल्यानगर शहरातही स्मार्ट मीटरला ग्राहकांकडून विरोध होत असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वाती सिरसुल यांनी, “स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांचे गैरसमज प्रथम दूर करा आणि त्यानंतरच त्यांच्या संमतीने मीटर बसवा,” अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वीज मंडळाने नियुक्त केलेल्या ठेकेदारांमार्फत सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी ग्राहकांना पूर्वसूचना न देता तसेच त्यांची संमती न घेता मीटर बदलले जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचे सिरसुल यांनी सांगितले. मीटर बदलल्यानंतर त्याची ऑनलाइन नोंदणी करून ते तातडीने कार्यान्वित केले जाते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ग्राहकाच्या निदर्शनास मीटर बदलल्याचे आले तरी जुना मीटर पुन्हा बसविणे किंवा बदलाबाबत तत्काळ आक्षेप नोंदविणे कठीण होते. या पद्धतीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण होत असून, ठेकेदारांच्या कामकाजावर वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तोफखाना परिसरातील मोची गल्ली, पंचरंग गल्ली व सातभाई गल्ली परिसरातून स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांच्या विरोधाचा विचार न केल्याच्या तक्रारी आल्याचे सिरसुल यांनी सांगितले. तसेच अपार्टमेंट व एकाच ठिकाणी अनेक वीज मीटर असलेल्या इमारतींमध्ये सोसायटीचे चेअरमन किंवा सदस्यांना पूर्वसूचना न देता मीटर बदलले जात असल्याच्या तक्रारीही त्यांनी मांडल्या. विशेषतः ग्राहकांच्या अनुपस्थितीत सुस्थितीत असलेले जुने मीटर बदलण्याऐवजी, प्रथम ग्राहकांना माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत आणि कार्यक्षमतेबाबत मोठ्या संख्येने ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. वापरलेल्या युनिटनुसार वीजबिल भरण्यास ग्राहकांची तयारी आहे; मात्र वापराच्या तुलनेत जास्त बिल येत असल्याच्या तक्रारी काही ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. पूर्वी सातशे ते आठशे रुपये येणारे मासिक बिल स्मार्ट मीटरनंतर अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत येत असल्याच्या तक्रारी असल्याने ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रथम शहरातील सदोष व फॉल्टी मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवावेत आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने, ग्राहकांना विश्वासात घेऊन स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया राबवावी, असे सिरसुल यांनी सुचविले.
दरम्यान, स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत स्मार्ट मीटरच्या शेजारी तीन महिन्यांसाठी चेक मीटर बसवून दोन्ही मीटरच्या नोंदींची पडताळणी करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगत सिरसुल यांनी या निर्णयाचे स्वागत केले. या प्रक्रियेमुळे स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत ग्राहकांच्या शंका दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. रमेश कुमार पवार, शहर विभागातील कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंते तसेच कनिष्ठ अभियंते यांनी तक्रारदार ग्राहकांशी सौजन्याने संवाद साधावा. स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, बिलिंग प्रक्रिया आणि ग्राहकांचे अधिकार याबाबत त्यांना योग्य माहिती देऊन गैरसमज दूर करावेत. त्यानंतर ग्राहकांची संमती घेऊनच नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात यावा, अशी मागणी सौ. स्वाती सिरसुल यांनी केली आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com