२९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर स्टेनोग्राफर पीरजादे नजीरहुसेन सेवानिवृत्त

नजीरहुसेन पीरजादे यांची कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी’ — गणेश सब्बन





अहिल्यानगर स्टेनोग्राफर्स असोसिएशनतर्फे सेवापूर्ती सोहळ्यात सत्कार; न्यायालयीन सेवेत दिलेल्या योगदानाचा गौरव







नगर :  जिल्हा न्यायालय, अहिल्यानगर येथे स्टेनोग्राफर ग्रेड-१ म्हणून प्रदीर्घकाळ कार्यरत राहिलेले श्री.पीरजादे नजीरहुसेन हे सुमारे २९ वर्षांच्या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ व समर्पित सेवेनंतर दि. ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त अहिल्यानगर स्टेनोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने सावेडी येथील हॉटेल सेज अँड साल्ट येथे सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करून त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करण्यात आला.



         श्री. पीरजादे यांनी न्यायालयीन सेवेत प्रवेश करण्यापूर्वी दोन नामांकित कंपन्यांमध्ये सुमारे सहा वर्षे स्टेनोग्राफर म्हणून सेवा बजावली. त्यानंतर दि. ९ जून १९९७ रोजी संगमनेर येथे कनिष्ठ लिपिक म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. कार्यकुशलता, मेहनत आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, हायर ग्रेड अशी पदोन्नती मिळवत स्टेनोग्राफर ग्रेड-१ अर्थात राजपत्रित अधिकारी, वर्ग-२ या पदापर्यंत यशस्वी मजल मारली.



        न्यायव्यवस्थेतील प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अचूकता, वेळेचे भान, जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्यनिष्ठा यांना नेहमीच प्राधान्य दिले. न्यायालयीन कामकाजातील त्यांची कार्यतत्परता व सेवाभाव सहकाऱ्यांसाठी तसेच नव्याने सेवेत दाखल होणाऱ्या स्टेनोग्राफरसाठी प्रेरणादायी ठरला. अहिल्यानगर स्टेनोग्राफर्स असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळत संघटनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.


       यावेळी बोलताना मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे पी.ए. श्री. गणेश सब्बन म्हणाले की, न्यायालयीन सेवेमध्ये काम करताना केवळ आपल्या पदाची जबाबदारी पार पाडणे पुरेसे नसते, तर कामामध्ये अचूकता, वेळेचे नियोजन, गोपनीयता आणि कर्तव्याप्रती प्रामाणिकपणा या गुणांची आवश्यकता असते. पीरजादे नजीरहुसेन यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात हे सर्व गुण सातत्याने जपले. त्यामुळे त्यांची सेवा ही केवळ नोकरी न राहता न्यायालयीन व्यवस्थेतील एक जबाबदार योगदान ठरली आहे.



       पुढे सब्बन म्हणाले की, पीरजादे यांनी आपल्या कार्यातून सहकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला आणि स्टेनोग्राफर म्हणून काम करताना अचूकता व कार्यतत्परतेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा अनेक सहकाऱ्यांना लाभ झाला आहे. सेवानिवृत्ती हा सेवेला पूर्णविराम नसून आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. या नव्या पर्वात त्यांना उत्तम आरोग्य, कौटुंबिक सुख, समाधान आणि आनंद लाभावा, तसेच त्यांनी आजवर कमावलेला सन्मान व आपुलकी कायम राहावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.



       पीरजादे कुटुंबाचे न्यायसंस्थेशी असलेले नातेही यावेळी विशेष अधोरेखित करण्यात आले. त्यांचे सुपुत्र श्री. साकिब पीरजादे हे जिल्हा न्यायालय, अहिल्यानगर येथे स्टेनोग्राफर ग्रेड-२ म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांचे धाकटे सुपुत्र बी.ए. एलएल.बी. तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे पीरजादे कुटुंबाचा न्यायसंस्थेशी असलेला जिव्हाळ्याचा आणि आत्मीय संबंध या निमित्ताने अधोरेखित झाला.



        या सेवापूर्ती सोहळ्याच्या आयोजनासाठी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राम बेल्हेकर, उपाध्यक्ष श्री. लयचेट्टी, श्री. धवळे, मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे पी.ए. श्री. गणेश सब्बन, सौ. कोमल लासुरे, सौ. वाव्हळ मॅडम तसेच असोसिएशनच्या इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट नियोजन, सुबक व्यवस्था आणि स्वादिष्ट भोजनामुळे सोहळा उत्साहपूर्ण व आपुलकीच्या वातावरणात पार पडला.



       यावेळी अहिल्यानगर स्टेनोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने श्री. पीरजादे नजीरहुसेन यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. न्यायालयीन सेवेत त्यांनी दिलेले योगदान, जपलेली कर्तव्यनिष्ठा आणि सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, समाधान आणि आनंद लाभावा, अशा मनःपूर्वक शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.