चांदबिबी महाल, भुईकोट किल्ल्यासह ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट; क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना अभिवादन

गीता परिवारातर्फे विद्यार्थ्यांची एकदिवसीय नगर दर्शन सहल




नगर : दर्शक ।  
           स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेल्या व डॉ. संजय मालपाणी कार्याध्यक्ष असलेल्या गीता परिवारातर्फे अहिल्यानगरमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. या संस्कार वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण देण्याबरोबरच अहिल्यानगरचा वैभवशाली ऐतिहासिक वारसा प्रत्यक्ष अनुभवता यावा, या उद्देशाने एकदिवसीय नगर दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. रविवार, ९ ऑगस्ट रोजी आयोजित या सहलीत तब्बल १५० विद्यार्थी सहभागी झाले.




         सहलीची सुरुवात ऐतिहासिक चांदबिबी महालापासून झाली. यावेळी विद्यार्थ्यांना महालाच्या परिसरात आढळणाऱ्या विविध औषधी वनस्पती तसेच चांदबिबी महालाशी संबंधित अनेक सूक्ष्म व महत्त्वपूर्ण बाबी इतिहास संशोधक प्रा. डॉ. नवनाथ काशिनाथ वाव्हळ यांनी अतिशय रोचक पद्धतीने समजावून सांगितल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाबरोबरच परिसरातील जैवविविधता आणि औषधी वनस्पतींचीही माहिती मिळाली.




       ‘विद्या धर्मेण शोभते’ या विचाराने गीता परिवार मूल्याधारित शिक्षणावर भर देतो. विद्या धर्माने सुशोभित होते. अर्थात, ज्ञान किंवा शिक्षण हे धर्माच्या सोबतच शोभायमान दिसते. केवळ पुस्तकी किंवा तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून त्यासोबत नैतिक मूल्ये आणि नैतिक आचरण असतील, तरच ती खरी आणि शोभिवंत विद्या ठरते. याच विचाराचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कृती आणि देशभक्तीच्या मूल्यांची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी या नगर दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले.



        क्रांती दिनानिमित्त गीता परिवाराच्या दक्षिण अहिल्यानगरच्या अध्यक्षा सौ. सुनंदा सोमाणी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर भुईकोट किल्ल्यातील नेता कक्षाला प्रत्यक्ष भेट देऊन ‘छोडो भारत’ आंदोलनातील देशभक्त आणि क्रांतिकारकांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ‘छोडो भारत’ आंदोलनातील प्रमुख १२ राष्ट्रीय नेत्यांनी भुईकोट किल्ल्यातील नेता कक्षात राजबंदी असताना केलेले कार्य, घेतलेली भूमिका, लेखन व चर्चा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.




         यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कक्ष, तेथील स्टडी टेबल, बेड, खुर्ची, त्यांचे हस्ताक्षर तसेच ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकासंदर्भातील काही दस्तऐवज याबाबत इतिहास संशोधक प्रा. डॉ. नवनाथ काशिनाथ वाव्हळ यांनी संदर्भासहित सविस्तर माहिती दिली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांच्या कार्याची प्रत्यक्ष ओळख झाली.




         गीता परिवाराने या नगर दर्शन सहलीच्या माध्यमातून अहिल्यानगरचा वैभवशाली वारसा समजावून घेतला. चांदबिबी महाल, भुईकोट किल्ला, फराह बाग आणि रणगाडा संग्रहालय या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन तेथील इतिहास, विविध ऐतिहासिक घटना, स्थापत्यकला आणि संबंधित स्थळांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. या संपूर्ण वारसा भेटीदरम्यान पर्यटक मार्गदर्शक तथा इतिहास संशोधक प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.



          क्रांती दिनाच्या निमित्ताने अभिवादन तसेच ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देण्याच्या या उपक्रमासाठी गीता परिवाराच्या अहिल्यानगर शाखा कार्यकारिणीतील सौ. सुनंदा सोमाणी, सौ. प्रतिभा बजाज, प्रा. श्री. सोमनाथ नजान, सौ. वर्षा चिखले, श्री. श्रीपाद कुलकर्णी, सौ. दुर्गा जाजू, सौ. ऐश्वर्या वंगा, सौ. अश्विनी कुलकर्णी, सौ. अर्चना जोशी, सौ. दीपा शर्मा, सौ. वंदना काकाणी, सौ. किशोरी बिहाणी, सौ. अर्चना झंवर, दीपा कांबळे, विशाखा जोग, वर्षा येवले, संगीता मालपाणी, सुनंदा सुपेकर, सीमा डमाल, सोनिया आरडे, रत्नमाला कुलकर्णी आणि ज्योती कुलकर्णी यांनी विशेष सहकार्य केले.



        या एकदिवसीय नगर दर्शन सहलीचे आयोजन करण्यासाठी गंगाबिशन मुरलीधर मणियार चॅरिटेबल ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्कार वर्गातून मिळणारे मूल्याधारित शिक्षण आणि प्रत्यक्ष ऐतिहासिक वारशाचा अनुभव यांची सांगड घालत गीता परिवाराने विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, इतिहास आणि देशभक्तीचा अनोखा अनुभव या नगर दर्शन सहलीच्या माध्यमातून दिला.