सुपा येथे रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या मोराला वनविभागाच्या मदतीने पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल




नगर : दर्शक ।  अहिल्यानगरहून शिक्रापूरकडे प्रवास करत असताना रस्त्यावर तीन कुत्रे एका मोरावर हल्ला करत असल्याचे दिसताच प्रसिद्ध रील्सस्टार हर्षदा जाधव हिने प्रसंगावधान राखत मोराची सुटका केली. ही घटना सुपा येथे घडली. जखमी मोराला वनविभाग पारनेरच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.




        शिक्रापूर (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध रील्सस्टार हर्षदा जाधव ही अहिल्यानगरहून शिक्रापूरकडे प्रवास करत होती. यावेळी सुपा परिसरातून जात असताना रस्त्याच्या कडेला तीन कुत्रे एका मोरावर हल्ला करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे मोर जखमी होऊन जीवाच्या आकांताने धडपडत होता. ही परिस्थिती पाहताच हर्षदा हिने तत्काळ आपला प्रवास थांबवत मोराच्या मदतीसाठी धाव घेतली.




        कुत्र्यांना बाजूला करत हर्षदा हिने धाडसाने मोराला त्यांच्या तावडीतून बाहेर काढले. यावेळी विशाल रुके आणि बबन रुके यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. तिघांनी मिळून जखमी मोराला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. मोराच्या शरीरावर जखमा झाल्याचे लक्षात आल्यानंतर हर्षदा हिने तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.




         घटनेची माहिती मिळताच वनविभाग पारनेरच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत आवश्यक कार्यवाही केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जखमी मोराला पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली.



         रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा वन्यजीव संकटात सापडल्याच्या घटना घडतात. मात्र, अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष न करता मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. हर्षदा जाधव हिने मोराची अवस्था पाहून दाखविलेली तत्परता आणि धाडस यामुळे एका वन्यजीवाचे प्राण वाचविण्यास मदत झाली. सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून लोकप्रिय असलेल्या हर्षदा हिने प्रत्यक्ष जीवनातही प्राणीमात्रांप्रती संवेदनशीलता दाखवत केलेल्या या कार्याचे सुपा परिसरासह नागरिकांकडून कौतुक होत आहे.




      वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून उपचार करण्याऐवजी संबंधित वनविभागाला तातडीने माहिती देऊन वन्यजीवाला सुरक्षितपणे उपचार मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे.