दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला ‘काजवा’ची साथ; जि. प. शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
नगर : दर्शक ।
शिक्षणाची आवड आणि गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘काजवा संस्था’ यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा देवीची वाडी (लाडगाव) तसेच गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रमांमुळे नावारूपास येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा रणद बुद्रुक (रंधा धबधबा परिसर) येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे संच देण्यात आले. या संचामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकलेचे साहित्य तसेच खाऊचा समावेश होता.
काजवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रविण धांडे व ट्रस्टी सपना धांडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमास ॲड. पोपरे सर, अरुण गोंदके सर, शाळेचे शिक्षक सरोक्ते सर, कातडे सर, प्रकाश धोंगडे यांच्यासह लाडगाव व रणद बुद्रुक येथील ग्रामस्थ, शाळा पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी काजवा संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी काजवा संस्थेचे पदाधिकारी रुपाली काळे, हरिदास धांडे, अंकुश काळे, योगीता सूर्यवंशी, रजनी धांडे उपस्थित होते.
काजवा संस्था केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरती मर्यादित न राहता समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिरे, महिला सबलीकरण, संस्कृती संवर्धन आणि रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रांतही सातत्याने काम केले जात असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रविण धांडे यांनी सांगितले.
दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व शिक्षकांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com