Crime News Nagar | खंडणीसह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अहिल्यानगर येथून जेरबंद ;  एलसीबीची कारवाई






Crime News Nagar | नगर |  खंडणी मागून चाकू व गावठी कट्ट्याचा धाक दाखवत सोन्याची चैन जबरीने लुटल्या प्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सुधीर संभाजी शिरसाठ (वय ३०, रा. आसरानगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी राहुल रामराव गर्जे (रा. फुलेनगर, ता. पाथर्डी) हे घरी जात असताना आरोपी सुधीर शिरसाठ व त्याच्या साथीदारांनी त्यांची गाडी अडवली.





आरोपींनी फिर्यादीकडे अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून व गावठी कट्ट्याचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने काढून घेतली. या घटनेप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते.





आरोपींच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे तसेच पोलीस अंमलदार विष्णू भागवत, सोमनाथ झांबरे, अशोक लिपणे, फुरकान शेख, किशोर शिरसाठ व आजिनाथ पाखरे यांचे पथक नियुक्त केले.





दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी मुख्य आरोपी सुधीर शिरसाठ हा अहिल्यानगर येथील हॉटेल सगम येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिरसाठला ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.