Jain Samaj Nagar | मासखमन व 60 आठई तपस्यानिमित्त तप अनुमोदना व भक्तिसंध्येला जैन बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Jain Samaj Nagar | मासखमन व 60 आठई तपस्यानिमित्त तप अनुमोदना व भक्तिसंध्येला जैन बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



नगर : दर्शक ।  केडगाव येथील अंबिकानगर जैन स्थानकात तपस्यानिमित् आयोजित करण्यात आलेल्या भक्तिसंध्या व भावा कार्यक्रमाला जैन समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माने भारलेल्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळाली.



          हा कार्यक्रम अंबिकानगर जैन स्थानक, केडगाव येथे जैन श्रावक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. पन्नालालजी बोकरीया यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.‘चलो झूम उठे भक्ती के धुन में वैदेही के संग’या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या भक्तिसंध्येत वैदेही बोरा यांच्या सुरेल भक्तिगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सुमधुर आवाजातील भक्तिगीतांवर भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला. संपूर्ण स्थानक परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.



           सौ. कविताजी संजयजी बाफना यांनी ३१ उपवासांची कठोर तपस्या पूर्ण व इतरही जणांनी तपस्या (उपवास)केल्याबद्दल समाजबांधवांकडून अनुमोदना देण्यात आली. जैन धर्मामध्ये तपश्चर्या, संयम आणि आत्मशुद्धीला विशेष महत्त्व असून, मासखमन ही अत्यंत कठोर तपश्चर्या मानली जाते. अशा प्रकारची तपश्चर्या करणाऱ्या साधकांच्या त्यागातून समाजाला संयम, श्रद्धा आणि आत्मिक शांतीचा संदेश मिळतो. त्यांच्या या तपश्चर्येचे उपस्थितांनी कौतुक करून त्यांना पुढील धार्मिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



         या कार्यक्रमात एक उपवास, बेला, तेला तसेच त्यापुढील तपस्या करणाऱ्या तपस्वींचाही विशेष सन्मान करण्यात आला. तपस्या करणाऱ्या प्रत्येक साधकाचा गौरव करून त्यांच्या धार्मिक साधनेला प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमाला केवळ भक्तिसंध्येचे स्वरूप न राहता तप, त्याग आणि संयमाचा गौरव करणारे स्वरूप प्राप्त झाले.


         कार्यक्रमासाठी जैन समाजातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुटुंबासह उपस्थित राहिलेल्या भाविकांनी भक्तिगीतांचा आनंद घेत धार्मिक वातावरणात सहभागी होत धर्मलाभ घेतला. कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील एकोपा आणि धार्मिक बांधिलकीचे दर्शन घडले. 



         श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, केडगाव-अहिल्यानगर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे अंबिकानगर स्थानक येथे प्रथमच भव्य आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रावक संघाच्या पदाधिकारी व गुरुदेव युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तपस्वींचा सन्मान, भक्तिगीतांची सुरेल मैफल आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे भक्तिसंध्या अत्यंत आनंददायी व संस्मरणीय ठरली.


        तप- अनुमोदना आयोजित या कार्यक्रमातून अहिंसा, संयम, त्याग आणि भक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचला. भक्तिसंध्येच्या समारोपावेळी उपस्थित भाविकांनी तपस्वींच्या तपश्चर्येबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले.


        यापुढेही संघपती श्री. पन्नालालजी बोकरीया यांच्या अध्यक्षतेखाली अंबिकानगर स्थानक मध्ये श्रावक संघ नवनवीन उपक्रम राबवत राहील.असे मतं पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.


        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयुरजी चोरडीया व श्री. सम्राटजी बरमेचा यांनी नियोजनबद्ध केले. तसेच आभार श्री. कमलेशजी गुंदेचा यांनी मानले.