Mahavitran | महावितरण कार्यालय अहिल्यानगर येथे अनुकंप धारकांच्या प्रलंबित प्रकरणांना गती; पात्र वारसदारांना कागदपत्रे व प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

Mahavitran |  नव्याने नियुक्ती म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर संकटग्रस्त कुटुंबाला महावितरणचा आधार — विकास आढे



 Mahavitran | नगर : दर्शक ।  महावितरणच्या सेवेत कार्यरत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी अहिल्यानगर मंडळाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रलंबित प्रस्तावांची पूर्तता, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, प्रस्तावातील त्रुटींचे निराकरण तसेच पात्र वारसदारांना प्रक्रियेबाबत मार्गदर्शन या उद्देशाने घेण्यात आलेल्या या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.



           महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता लटपटे यांच्या प्रेरणेतून, अहिल्यानगर मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि नाशिक परिमंडळाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) चंद्रकांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले.



          शिबिराच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे जनसंपर्क अधिकारी विकास आढे तसेच श्री चंद्रकांत खाडे साहेब सहाय्यक महाव्यवस्थावक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी तसेच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी प्रतीक्षेत असलेले पात्र वारसदार उपस्थित होते. शिबिरात संबंधित प्रकरणांची प्रत्यक्ष छाननी करून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तसेच प्रस्तावांमध्ये असलेल्या त्रुटी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि पुढील कार्यवाही याबाबत संबंधितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले



           यावेळी मार्गदर्शन करताना जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या प्रक्रियेकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता त्यामागील मानवी संवेदना लक्षात घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “महावितरणमध्ये सेवा बजावताना एखाद्या कर्मचाऱ्याचे दुर्दैवी निधन झाले की त्या कुटुंबावर अचानक मोठे संकट कोसळते. कुटुंबाचा आधार हरपल्याने निर्माण झालेली आर्थिक व मानसिक पोकळी भरून काढणे सहज शक्य नसते. अशा वेळी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती ही केवळ रोजगाराची संधी नसून संबंधित कुटुंबाला आधार देण्याची आणि त्यांना पुन्हा उभे करण्याची महावितरणची संवेदनशील भूमिका आहे.



         तसेच श्री शंकर जारकड जिल्हाअध्यक्ष तांत्रिक कामगार युनियन (५०५९) यांनी देखील संबधीत उपस्थित अनुकंपधारकांना मार्गदर्शन करताना अनुकंपा धारकांना बी कॉम शिक्षण घेऊन नोकरी लवकरात लवकर लागू शकते असे आश्वासित करून सविस्तर मार्गदर्शन केले.



         “पात्र वारसदारांच्या प्रस्तावांमध्ये केवळ कागदपत्रे दिसत नसून त्यामागे एका कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न असतो. त्यामुळे प्रस्तावांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या वेळेत निदर्शनास आणून देणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेणे आणि पात्र प्रकरणांना विनाकारण विलंब होऊ न देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आजच्या विशेष शिबिराच्या माध्यमातून प्रलंबित प्रस्तावांवर थेट कार्यवाही होत असून, संबंधित वारसदारांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असेही आढे यांनी स्पष्ट केले.



        ते पुढे म्हणाले की, “अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रशासन व कर्मचारी यांच्यातील समन्वय महत्त्वाचा आहे. पात्र कुटुंबांना आवश्यक ती माहिती आणि मार्गदर्शन वेळेत मिळाल्यास अनेक प्रस्तावांची पूर्तता जलदगतीने होऊ शकते. त्यामुळे संबंधित वारसदारांनीही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.



         अध्यक्षीय मार्गदर्शनात सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) चंद्रकांत खाडे यांनी विशेष शिबिरांमुळे प्रलंबित अनुकंपा प्रकरणांची कार्यवाही अधिक वेगाने पूर्ण करण्यास मदत होत असल्याचे सांगितले. पात्र कुटुंबांना वेळेत न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. कर्मचारी, वारसदार आणि प्रशासन यांच्यातील समन्वयातून ही प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत असून, प्रलंबित प्रस्तावांची पूर्तता जलदगतीने करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.



         शिबिरामध्ये उपस्थित वारसदारांच्या प्रस्तावांची छाननी करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. संबंधितांच्या विविध शंकांचे निरसन करून पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक प्रलंबित प्रस्तावांना गती मिळण्यास मदत होणार असून पात्र कुटुंबांना लवकरात लवकर दिलासा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



         कार्यक्रमाच्या शेवटी अहिल्यानगर मंडळाचे व्यवस्थापक (मानव संसाधन) सुदीप साळवे यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी यांचे आभार मानले.