Nagar Press | पत्रकार सुशील थोरात यांच्यावर हल्ला; हल्लेखोरांवर मकोका कारवाईची मागणी
Nagar Press | नगर : दर्शक | नगर शहरात गुंडगिरी फोफावत चालली असून या गुंडांची मजल थेट पत्रकारांवर हल्ला करण्यापर्यंत पोहचली आहे. सावेडीसह शहरात अवैध धंदे करणाऱ्या नशेखोर टार्गेट तरुणांच्या टोळक्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. याच टोळक्याने साम टीव्ही चॅनलचे पत्रकार सुशील थोरात यांच्यासह त्यांच्या मुलगा सार्थक या दोघांवर पाईपलाईन रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर गुरुवारी (दि. २० ऑगस्ट २०२६) सायंकाळी जीवघेणा हल्ला केला.
ज्यांनी हा हल्ला केला त्याचे अवैध व्यवसाय असून थोरात यांनी त्यांच्या अवैध व्यवसायाची बातमी केली होती. तेव्हापासून ते थोरात यांच्यावर हल्ला करण्याची संधी शोधत होते. कारचाकी वाहनाला डॅश लागल्याच्या किरकोळ कारणावरून हा हल्ला झाला. 'ठोकून टाकू, सोडायचे नाही,' अशी भाषा वापरत हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यातून सुदैवाने सुशील थोरात बचावले.
शहरातील बहुतांश मोकळ्या जागेत नशेखोरी करायची अन् नशेत लूटमार, हल्ला करण्याच्या घटना वाढत आहे. त्यातूनच या नशेखोर टोळक्याची हिम्मत थेट पत्रकारांवर हल्ला करण्यापर्यंत पोचली आहे. आज सुशील थोरात यांच्यावर हल्ला झाला, उद्या आणखी दुसरे कोणी असेल?, त्यामुळे पत्रकारांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हल्लेखोरांचा तत्काळ शोध लावून त्यांना अटक करावी.
नुसतीच अटक नाही, तर पत्रकार संरक्षण कलमासह गंभीर स्वरूपाचे कलम नोंदवून घेत त्यांचा जामीन होणार नाही, यादृष्टीने कारवाई करावी, अशी आम्हा पत्रकारांची मागणी आहे.हल्लेखोरांविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. हल्लेखोरांवर 'मकोका'सारखी कारवाई करावी, अशी आमची विनंती आहे. मा. साहेब, आपण यात स्वतः लक्ष घालून कारवाई करावी ही नम्र विनंती.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com