New Arts College | न्यु आर्टस् महाविद्यालयात रंगनाथन जयंती उत्साहात

New Arts College | न्यु आर्टस् महाविद्यालयात रंगनाथन जयंती उत्साहात





 New Arts College |  नगर : दर्शक ।         ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे भांडार नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञानविकासाचे आणि व्यक्तिमत्त्व घडविण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील उपलब्ध ज्ञानसंपदेचा अधिकाधिक उपयोग करून आपल्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा द्यावी, असे आवाहन न्यु आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले.


       न्यु आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रंथालयशास्त्राच्या क्षेत्रात डॉ. रंगनाथन यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचे स्मरण करून त्यांच्या ज्ञानविषयक योगदानाला अभिवादन करण्यात आले.


       महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच ग्रंथालयातील विविध संदर्भग्रंथ, पुस्तके आणि अन्य ज्ञानस्रोतांचा प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. गेल्या वर्षभरात महाविद्यालयीन ग्रंथालयातील ज्ञानसंपदेचा सर्वाधिक प्रभावी वापर करणाऱ्या कु. गीता तोडमल हिला ‘बेस्ट युझर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. तसेच ग्रंथालयशास्त्र विषयातील नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल चि. आकाश सांगळे याचा सत्कार करण्यात आला.


      महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणात ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करताना उपस्थितांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचन, संदर्भग्रंथांचा अभ्यास आणि विविध ज्ञानस्रोतांचा उपयोग करावा, असे मत व्यक्त केले. डिजिटल युगात माहितीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी प्रमाणित आणि दर्जेदार ज्ञानासाठी ग्रंथालयाचे महत्त्व कायम असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.





        कार्यक्रमास महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. संगिता निमसे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, रजिस्ट्रार श्री. बबन साबळे, महाविद्यालयातील प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी श्रीमती एस. एस. डांगे, श्री. चेतन साळवे, श्री. बनसोड, श्री. मते, श्री. म्हस्के यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       


कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासोबतच महाविद्यालयीन ग्रंथालयाचा शैक्षणिक विकासातील महत्त्वाचा वाटा अधोरेखित झाला.