शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी जिजामाता चौकाच्यावतीने पालिका प्रशासनाकडे मागणी
कुत्रा चावल्याची एखादी भयंकर दुर्घटना घडल्यानंतर पालिका प्रशासन उपाययोजना करणार का ? मा.उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांचा न.पा. प्रशासनाला सवाल
SHRIRAMPUR NEWS | श्रीरामपूर : दर्शक । शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर केवळ निर्बिजीकरणाची प्रक्रिया करून प्रश्न सुटणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून श्रीरामपूर नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी जिजामाता चौकाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात श्रीरामपूर नगर परिषदेचे मा. उपनगराध्यक्ष संजय ज. छल्लारे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे हा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांवर नेमकी कोणती कार्यवाही केली जाते, याबाबत प्रशासनाकडून नागरिकांना स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नगर परिषदेकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना पुन्हा शहरात सोडले जाते, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. मात्र, त्यामुळे कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्यामुळे निर्माण होणारी नागरिकांच्या सुरक्षेची समस्या पूर्णपणे सुटत नाही. शेजारील गावांमधील भटके कुत्रेही श्रीरामपूर शहरात आणून सोडले जात असल्यास त्यावरही काही निर्बंध असणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पूर्वी जनावरांसाठी कोंडवाड्याची व्यवस्था केली जात होती. त्याच धर्तीवर भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र निवारा अथवा सुरक्षित व्यवस्था नगर परिषदेने निर्माण करावी. कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना मारणे हा उपाय नसल्यास त्यांच्या संगोपनासाठी नगर परिषदेने ठोस व्यवस्था करावी, असेही छल्लारे यांनी स्पष्ट केले.
"कुत्र्यांवर अन्याय होऊ नये, मात्र नागरिकांच्याही जीविताची सुरक्षितता महत्त्वाची आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच नगर परिषदेने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे," अशी भूमिका त्यांनी मांडली.
भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र उभारणे, त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे अथवा शासनाच्या नियमांनुसार सुरक्षित ठिकाणी त्यांची व्यवस्था करणे, याबाबत नगर परिषदेने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जिजामाता चौकाच्या वतीने करण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी आणि कायदेशीर तोडगा काढावा, किंवा शहरातील सदरील सर्व मोकाट कुत्री एकत्र करून एखाद्या जंगलात तरी सोडावी अशी त्रस्त शहरवासी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वृत्त शौकतभाई शेख
प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com